द्राक्षावर दावण्या, करप्याचा हल्ला
By Admin | Updated: September 23, 2014 23:59 IST2014-09-23T23:36:45+5:302014-09-23T23:59:29+5:30
मिरज पूर्वमधील चित्र : बागायतदार हैराण; तीस टक्के क्षेत्र रोगांनी प्रभावित...

द्राक्षावर दावण्या, करप्याचा हल्ला
प्रवीण जगताप- लिंगनूर -मिरज पूर्व भागातील लिंगनूर, संतोषवाडी, बेळंकी, खटाव, जानराववाडी व परिसरातील छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांत दावण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. आठवडाभरातील ढगाळ, आर्द्र हवामान व पावसाच्या सरींमुळे येथील बागांत दावण्या, करपा या रोगांनी हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. सुमारे ३० टक्के क्षेत्र रोगांनी प्रभावित झाले असून, वातावरणाने साथ न दिल्यास रोगांची तीव्रता वाढून द्राक्ष उत्पादकांसमोर संकट उभे ठाकणार आहे.
हंगामपूर्व द्राक्षोत्पादनासाठी मिरज पूर्व भाग प्रसिद्ध आहे. जादा दराच्या अपेक्षेने आगाप छाटणी घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सध्या आॅगस्ट छाटणीच्या द्राक्षबागा रोगांच्या तडाख्यात सापडल्या आहेत. आठवडाभरात दोन दिवस पाऊस, दोन दिवस ढगाळ हवामान आणि आज (मंगळवारी) पहाटे अडीच ते सकाळी सहापर्यंत पडलेला संततधार पाऊस यामुळे पुन्हा रोगांची वाढ होणार आहे. द्राक्षबागांमधील दावण्या, करपा, थ्रीप्स अशा रोगांची तीव्रता वाढू लागली आहे.
छाटणी झालेल्या प्रत्येक बागेत दावण्याची लागण झाली आहे. त्यामुळे महागड्या औषधांची फवारणी करून या बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक आटापिटा करू लागले आहेत.
रोगांचे आक्रमण वाढल्याने द्राक्ष उत्पादक सकाळ-सायंकाळ औषध फवारण्या करत आहेत. त्यामुळे औषधांची विक्री भरमसाट वाढली आहे. ही औषधे महागडी असून एकावेळी सुमारे दोन हजार रुपयांचा खर्च होत आहे. औषध विक्रेत्यांची मात्र सुगी सुरू झाली आहे.
चांगल्या जातीच दावण्याच्या शिकार
शरद सीडलेस (काळी द्राक्षे) व सुपर सोनाक्का या सर्वाधिक दर देणाऱ्या जातीच दावण्या रोगाच्या शिकार होऊ लागल्या आहेत. दराच्या अपेक्षेने केलेल्या लागणी आता रोगांच्या तडाख्यातून वाचविणे मुश्कील होऊन बसले आहे.
सध्याचे आर्द्र, ढगाळ, पावसाळी वातावरण व उकाडा दावण्याच्या वाढीस पोषक बनत आहे. या वातावरणात दावण्या वेगाने वाढतो. सकाळ-सायंकाळ दोनवेळा फवारण्या कराव्या लागत आहेत. महागडी औषधेही दावण्यावर १०० टक्के नियंत्रण आणू शकत नाहीत. वातावरण स्वच्छ झाल्यानंतरच औषधे जास्त प्रभावी ठरतात. तोपर्यंत औषध फवारणीने पन्नास टक्केच फायदा होतो, असा अनुभव आहे.
- रुद्राप्पा कोथळे,
द्राक्ष उत्पादक, संतोषवाडी