जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त

By Admin | Updated: January 3, 2015 00:10 IST2015-01-02T23:23:20+5:302015-01-03T00:10:53+5:30

बदलत्या हवामानाचा फटका : कोट्यवधींचे नुकसान

Grape cultivator worried in the district | जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त

कवठेएकंद : गेल्या काही वर्षांपासून तासगाव तालुक्यातील द्राक्षशेतीसह सर्वच प्रकारच्या शेतीला नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ, अति पाऊस, अवकाळी, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
सध्या द्राक्ष हंगामातील काढणीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे आगाप असणाऱ्या द्राक्षबागांमध्ये द्राक्ष काढणी सुरू आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान, दोन दिवसात पडलेल्या पावसाच्या सरी यामुळे काढणीच्या द्राक्षबागांना मोठा धोका पोहोचत असून कोट्यवधीचे नुकसान होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्याने फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे द्राक्ष मण्यांचे अंकुर गळून गेले, तर अधिक फटका बसलेल्या भागात द्राक्षांचे घडही गळून पडले. त्यामुळे हंगामावर विपरित परिणाम झाला होता. काही भागात ५० टक्केहून अधिक द्राक्षाचे नुकसान झाले. त्या अवकाळीत कशाबशा वाचलेल्या द्राक्षबागा आता अंतिमक्षणीही अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत.
कवठेएकंद, उपळावी, मणेराजुरी, कुमठे, नागाव कवठे, योगेवाडी, सावर्डेसह परिसरास गेल्या चार दिवसात दोनवेळा पावसाने झोडपले. यामुळे परिसरातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. परिपक्व असणाऱ्या द्राक्षमण्यांमध्ये पाणी गेल्याने फळकूज, मणी तडकणे यासारखा प्रादुर्भाव होत असल्याने, पावसाने उत्पन्नात घट होत आहे. अवकाळीच्या तडाख्यातून द्राक्षबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी आव्हान बनले आहे. बागा वाचविण्यासाठी महागडी औषधफवारणी करून शेतकरी मेटाकुटीस आला असून, आता अंतिम टप्प्यातही पावसाने झोडपल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
द्राक्षबागांसाठी अमाप पैसे खर्चूनही हाती काहीच लागत नाही, असे चित्र असल्याने भीतीचे वातावरण आहे. काही बागायतदारांनी पावसापासून द्राक्षघडांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक द्राक्षघडांना प्लॅस्टिक पिशव्या बांधून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांची, द्राक्ष बागायतदारांची कळा मात्र बिघडून गेली आहे. (वार्ताहर)

ढगाळ हवामान व कडाक्याची थंडी
पलूससह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. पलूस तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान व कडाक्याची थंडी यामुळे द्राक्षपिकावर बुरशी व दावण्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यातील लहरी हवामानामुळे ज्या बागा बागायतदारांनी वाचविल्या, त्या बागा आता हंगाम सुरु होण्यापूर्वीच ढगाळ हवामानामुळे धोक्यात आल्या आहेत. परिसरात ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा परिणाम होऊ नये म्हणून दिवसातून दोनवेळा शेतकरी औषधांची फवारणी करु लागला आहे. या लहरी हवामान बदलाचा तालुक्यातील द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने, सर्व बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे.

Web Title: Grape cultivator worried in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.