जालिहाळमध्ये ग्रामपंचायत बिनविरोधचा ‘सुवर्णमहोत्सव’
By Admin | Updated: August 1, 2015 00:22 IST2015-07-31T23:45:20+5:302015-08-01T00:22:42+5:30
परंपरा जपली : सलग दहावी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व

जालिहाळमध्ये ग्रामपंचायत बिनविरोधचा ‘सुवर्णमहोत्सव’
संख : गावाचा विकास करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ५० वर्षांची परंपरा जपत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून जत तालुक्यातील जालिहाळ खुर्दच्या ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. राजकारणासाठी राजकारण, तर विकासासाठी ऐक्य जपत सलग १० वी निवडणूक बिनविरोध झाली आहे. जालिहाळ खुर्द कर्नाटक सीमेलगत जतपासून पूर्वेकडे २८ कि.मी. अंतरावरील गाव. लोकसंख्या अवघी १०४१. द्राक्षे, डाळिंब, बागायतदारांचे सधन गाव, बेदाणा उत्पादनात आघाडीवर. ग्रामपंचायतीची स्थापना १० नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. सुरुवातीपासून गावात एकी असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याची वेळच आली नाही. विरोध म्हणजे गावामध्ये भाजप, काँग्रेस पक्षाचे गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायत, विकास सोसायटीची निवडणूक वगळता बाकीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने भाग घेतला जातो. १९९० पर्यंत गावाचे नेतृत्व श्रीमंत पाटील, बाबूराव चव्हाण, रामजी पाटील, निवृत्ती सूर्यवंशी, आप्पा शिंदे, सिदगोंडा पाटील या जाणत्या नेत्यांकडे होते. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्या कालावधित गावाचा विकास झाला. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून प्राथमिक मराठी शाळेची इमारत उभारली आहे. १९९० नंतर गावाचे नेतृत्व तरुण पिढीकडे आले. माजी सरपंच कामाण्णा पाटील, माजी अध्यक्ष राजू डफळे सरकार, केरुबा बिराजदार, कुंडलिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो. ग्रामपंचायत निवडणूक, विकास सोसायटी निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम गावामध्ये दवंडी दिली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करतात. पंचांची निवड करतात. तरुण, सुशिक्षित, काम करण्याची आवड हे निकष ठेवून निवड केली जाते. लगेच त्याचवेळी सरपंच, उपसरपंचांची निवड केली जाते. कोणताही राजकीय गट यामध्ये राजकारण आणत नाही. तंटामुक्ती पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, इको व्हिलेज, असे पुरस्कार गावाला मिळाले आहेत. (वार्ताहर)
उमदी.. पोलीस हद्दीतील शांतताप्रिय गाव
उमदी हे पोलीस हद्दीतील शेवटचे गाव आहे. गावामध्ये पंचायत भरवून न्यायनिवाडा केला जातो. आतापर्यंत एकही वाद न्यायालयापर्यंत गेलेला नाही. गावातील खटला नोंदीचे रजिस्टर कोरेच आहे. निवडणुकीवेळी गावात पोलीस येतात. गावात एकच गणपती बसविला जातो.
महिलांना संधी
पुरुषांबरोबर महिलांनाही संधी देण्यात आली आहे. यापूर्वी उपसरपंच म्हणून गंगवा कोळी, तुळसाबाई करपे यांनी काम पाहिले आहे. पहिल्या महिला सरपंच म्हणून यल्लव्वा प्रल्हाद पाटील यांनी काम पाहिले आहे. यावेळी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून इतिहासात प्रथमच शांता दादा जावीर यांना संधी मिळणार आहे..
लोकांमध्ये द्वेष, राजकीय वैमनस्य राहत नाही. विकासामध्ये राजकारण होत नाही. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
- कामाण्णा पाटील, सरपंच
५५ वर्षे निवडणूक बिनविरोध झाल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे.
- राजू डफळे सरकार, उपसरपंच