दिलीप मोहितेविटा : कार्वे औद्योगिक वसाहत विटा शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. परफ्युम व केमिकलच्या नावाखाली एमडी ड्रग्ज कारखाना सुरू होता. त्याचा पत्ता विटयातील पोलिस यंत्रणा, तसेच अन्न व औषध प्रशासनाला कसा लागला नाही? तसेच हा कारखाना सुरू करताना औद्योगिक विकास महामंडळाचा परवाना का घेतला नाही? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे कारखान्याबाबत सरकारी यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.तब्बल सात वर्षे तुरुंगाची हवा खाऊन बाहेर येताच कार्वे येथे येऊन एमडी ड्रग्ज तयार करण्याचे धाडस गुजरातचा मास्टरमाईंड राहुदीप बोरीचा याने केले. त्याला शासकीय यंत्रणा किंवा स्थानिक कोणाचा वरदहस्त आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे.एमआयडीसीत माउली इंडस्ट्रीजमध्ये मेफॅड्रॉन (एमडी) नशेचे ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोमवारी रात्री केला. त्यानंतर जिल्हाभर खळबळ उडाली आहे. या कारवाईत सुमारे ३० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी केमिकल, तसेच अत्तर आणि परफ्यूम बनविण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचा प्रकार उजेडात आला. परंतु, याची कल्पनाही स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासकीय यंत्रणांना कशी आली नाही? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
गुजरातच्या मास्टरमाईंडचे विटा कनेक्शनविटा येथील एमडी ड्रग कारखान्यावरील छाप्यात पोलिसांनी गुजरातचा मास्टरमाईंड राहुदीप बोरीचा, मुंबईचा सुलेमान जोहर शेख व विट्याचा बलराज कोतारी या तिघांना अटक केली. या तिघांवरही विविध गुन्हे दाखल असल्याने ते सराईत गुन्हेगार आहेत. बोरीचा याने विट्यातील कातारी याच्या जुन्या ओळखीचा फायदा घेत थेट विट्यातील कार्वे एमआयडीसीतील बंद कारखान्याचे शेड शोधून काढले. त्यानंतर त्यांनी या शेडच्या मालकाची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला व आम्हाला अत्तर, परफ्यूम आणि केमिकल निर्मितीचा कारखाना सुरू करायचा असल्याचे सांगितले. भाडेपट्ट्याने शेड ताब्यात घेतले. परंतु, त्यात अत्तर, परफ्यूमऐवजी मेफॅड्रॉन एमडी तयार करण्याचे काम सुरू केले.
जिल्हा व स्थानिक प्रशासन अनभिज्ञविटा ते सांगली या रहदारीच्या मार्गावरील कार्वे येथे एमडी ड्रगचा कारखाना सुरू करून कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची निर्मिती होते. तिही शासनाच्या एमआयडीसी भागातील शेड भाड्याने घेऊन राजरोस दीड ते दोन महिन्यांपासून उत्पादन सुरू आहे. तरीही त्याचा पत्ता स्थानिक प्रशासनाला लागत नाही. पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळत नाही. त्यामुळे सर्वच सरकारी यंत्रणा सध्या तरी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
माउली इंडस्ट्रीजला २०२० साली हा प्लॉट जावळे यांच्याकडून हस्तांतरण केला आहे. तारेचे मोळे, खिळे तयार करण्यासाठी परवानगी घेतली. मात्र, उद्योग सुरू केला नाही. त्यामुळे त्यांना गेल्या दीड वर्षापूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतर या प्लॉटच्या जागेत आमच्या परस्पर कोणता उद्योग सुरू झाला. त्याची तपासणी आम्ही केली नाही. त्यामुळे एमडी ड्रग कारखान्याबाबत एमआयडीसी विभागाला काहीही माहिती नाही.- एम. के. कुलकर्णी, क्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी, सांगली विभाग