प्रामाणिक करदात्यांच्या सन्मानास सरकार कटिबध्द : सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:01 IST2018-11-16T21:58:45+5:302018-11-16T22:01:53+5:30
सांगली : एक कर, एक देश या सरकारच्या धोरणामुळे करप्रणालीत सुसूत्रता येत आहे. नवीन करप्रणाली व्यापारी, उद्योजकांसाठी फायदेशीर असल्याने ...

सांगलीत शुक्रवारी वस्तू व सेवा कर भवनच्या नूतन वास्तुचे लोकार्पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नीता केळकर, शर्मिला मिस्कीन, राजीव जलोटा, सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, रेश्मा घाणेकर, विजय काळम-पाटील उपस्थित होते.
सांगली : एक कर, एक देश या सरकारच्या धोरणामुळे करप्रणालीत सुसूत्रता येत आहे. नवीन करप्रणाली व्यापारी, उद्योजकांसाठी फायदेशीर असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अप्रामाणिक करदात्यांवर दंडाची शिक्षा करण्याबरोबरच प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करण्याची सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सांगलीत केले.
राज्य कर विभागाच्या वस्तू व सेवा कर भवनच्या नूतन वास्तूचे लोकार्पण व कोल्हापूर विभागातील आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, राज्य कर आयुक्त राजीव जलोटा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्रालयाचे हृदय म्हणून राज्य कर विभागाला ओळखले जाते. हा विभाग नेहमीच आईच्या भूमिकेत असतो. आई ज्याप्रमाणे सर्वप्रथम परिवारातील इतरांची काळजी करून मगच आपला विचार करते, अगदी तसेच हा विभाग सर्वप्रथम इतर विभागांची काळजी करून आपली जबाबदारी सांभाळतो.
केंद्राने स्वीकारलेल्या एक कर एक देश प्रणालीमुळे करदात्यांना सुविधा प्राप्त झाली आहे. प्रामाणिकपणे कर भरणाºयांना मदतीचा हात देत, त्यांना सुविधा देतानाच अप्रामाणिक करदात्यांवर दंडाची कारवाईही करणार आहे. काही वस्तूंवरील कर कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, कर तर घेतला पाहिजे, पण जादा त्रास करदात्यांना देऊ नये.
यावेळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अप्पर राज्यकर आयुक्त चंद्रहास कांबळे, राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, शर्मिला मिस्कीन, अशोक सानप, योगेश कुलकर्णी यांच्यासह राज्य कर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सांगलीतील वस्तू व सेवा कर विभागाची दिमाखदार वास्तू झाली असून या कार्यालयातून करदात्यांना चांगला व्यवहार, वागणूक व नम्रतेची सेवा अपेक्षित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कर विभागात आयएसओ मानांकन मिळविण्यात कोल्हापूर विभाग यशस्वी झाला आहे. सांगलीला २०३ कोटींचे उद्दिष्ट असतानाही त्यांनी २२८ कोटींची वसुली करून आपली क्षमता सिध्द केल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.