आष्ट्यात सोसायटी कर्मचाऱ्यांकडून सोन्याचे गंठण परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:12+5:302020-12-26T04:22:12+5:30
आष्टा : येथील आष्टा दक्षिण भाग सोसायटीचे धान्य विभागप्रमुख मनोहर बापूसाहेब शिंगटे यांना एका नववधूचे अडीच तोळ्यांचे सुमारे सव्वा ...

आष्ट्यात सोसायटी कर्मचाऱ्यांकडून सोन्याचे गंठण परत
आष्टा : येथील आष्टा दक्षिण भाग सोसायटीचे धान्य विभागप्रमुख मनोहर बापूसाहेब शिंगटे यांना एका नववधूचे अडीच तोळ्यांचे सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे गंठण सापडले. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील तानाजी डोंगरे यांच्या कन्येचा नुकताच विवाह झाला. तिला भेट देण्यासाठी तानाजी डोंगरे हे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण घेऊन आले. यावेळी दक्षिण भाग सोसायटीनजीक एका भांड्यांच्या दुकानात भांडी खरेदी करतेवेळी सोसायटीच्या धान्य दुकानासमोर ते बसले असता कापडी पिशवीसह गंठण पायरीवरच विसरले. मनोहर शिंगटे यांना दुकान बंद करून जाताना ते सापडले. त्यांनी चौकशी केली; मात्र कोणाचे हरवले ते समजले नाही.
माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध यांना तानाजी डोंगरे यांचे गंठण हरवल्याचे समजल्यानंतर त्यांनी चौकशी केली. डोंगरे यांनी संबंधित कागदपत्रे आणून दाखवली, ओळख पटवली.
मनोहर शिंगटे यांनी प्रामाणिकपणे गंठण परत केल्यानंतर नववधूच्या आनंदाला पारावर उरला नाही. मनोहर शिंगटे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जिल्हा परिषदचे सदस्य संभाजी कचरे, सोसायटीचे मार्गदर्शक शिवाजीराव ढोले, मोहन गायकवाड, रामचंद्र सिद्ध, बाबासाहेब सिद्ध यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अरुण इंगवले, सचिन जाधव, विलास आटुगडे, काशीनाथ सिद्ध, अमर शेळके, सोन्या शेळके, सचिन बोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २५१२-आयएसएलएम- मनोहर शिंगटे सत्कार न्यूज
फोटो ओळ : आष्टा (जि. सांगली) येथे मनोहर शिंगटे यांनी प्रामाणिकपणे सोन्याचे गंठण परत केल्याबद्दल संभाजी कचरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवाजीराव ढोले, बाबासाहेब सिद्ध, रामचंद्र सिद्ध, मोहन गायकवाड उपस्थित होते.