‘गोकुळ’चे राजकारण झाले, अर्थकारण टिकावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:00+5:302021-05-09T04:27:00+5:30

‘आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय’, अशी घोषणा देत सतेज पाटील यांनी महाडिक गटाचा पराभव करण्याचा चंग बांधला होता. याची सुरुवात ...

Gokul's politics is over, economy must survive! | ‘गोकुळ’चे राजकारण झाले, अर्थकारण टिकावे!

‘गोकुळ’चे राजकारण झाले, अर्थकारण टिकावे!

‘आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय’, अशी घोषणा देत सतेज पाटील यांनी महाडिक गटाचा पराभव करण्याचा चंग बांधला होता. याची सुरुवात २०१४ मध्ये झाली होती. लोकसभा निवडणुकीत अनेकांच्या आग्रहामुळे सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मदत केली. मात्र, चारच महिन्यांत विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटील या विद्यमान आमदाराविरुद्ध महादेवराव महाडिक यांनी आपले चिरंजीव अमल महाडिक यांना भाजपकडून उभे केले. भाजपचे थोडे वारे होते. त्यात अमल महाडिक निवडून आले. त्यांच्या विजयाचा गुलाल धनंजय महाडिक यांनी अंगावर घेऊन नाचायचे काही कारण नव्हते, तो भाजपचा विजय आहे, आपला संबंध नसल्याचे सांगून मोकळे व्हायला हवे होते; पण एकामागून एक चुका करीत महाडिक गट भाजपच्या नादाने भरकटत गेला. भाजपला ना महाडिक गटावर प्रेम होते, ना सतेज पाटील यांचा पराभव करायचा होता, अन्यथा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी पुरस्कृत केलेले शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी लढताना भाजपने मदत केली नसती. सतेज पाटील यांनी महाडिक गटाचा पराभव करण्यासाठी मातोश्रीपासून देवेंद्र फडणवीस ते चंद्रकांत पाटील आदींची मदत जमा करण्यात आघाडी घेतली होती. ही सर्व ताकद महाडिक गटाचा पराभव करण्यासाठी होती. तसा तो पराभव धनंजय महाडिक यांचा प्रचंड मताधिक्याने केला. यामागे केवळ सतेज पाटील होते, हे आता साऱ्यांना माहीत आहे. सोशल मीडियापासून विविध प्रकारे सर्व्हे करून डावपेच निश्चित करणारी एक भलीमोठी टीम त्यांच्यासाठी राबत असते. एका बाजूला लोकसभेची तयारी, दुसरीकडे विधानसभा, तिसऱ्या पातळीवर कोल्हापूर महापालिका, गोकुळ संघ आदींची तयारी होतीच. या वेगाने पळणारा नेता आता तरी कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा नाही.

आम्ही ठरवू तो पक्ष आणि झेंडा, महाडिक गट यांनाच माना नेता, अशी भूमिका घेऊन महादेवराव महाडिक यांनी अनेक वर्षे राजकारण केले. त्यांचे मोकळेढाकळे नेतृत्व आणि ‘मॅनेज’ करण्याची ताकद यावर आजवर राजकारण चालत आले. कालौघात राजकारण आणि समाजातील आर्थिक हितसंबंधही बदलत जातात. त्यानुसार महाडिक गट बदलण्यास तयार नसल्याने या गटाच्या अलीकडे मर्यादा स्पष्टपणे जाणवत होत्या. त्या यावेळी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवल्या. मध्यंतरी राज्यात महाआघाडी स्थापन होताच, कोल्हापूर जिल्हा परिषदेची समीकरणेही बदलली, अमल महाडिक आमदार असताना त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या. तेथील समीकरणे बदलणे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना सहज शक्य होते. ते त्यांनी केले. गोकुळसारख्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या सर्वोत्तम संस्थेचे राजकारण सुरू झाले. वास्तविक एक नेता, एक संस्था असा महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तीन दशके कारभार चालू होता; पण मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारून चूक केली होती. महाडिक गटास हादरे द्यायला सतेज पाटील यांनी चोहोबाजूने ताकद एकवटली. यामध्ये खासदार हा जिल्ह्याचा नेता असतो, अशा भूमिकेतून धनंजय महाडिक यांनी भाग घ्यायला नको होता. त्यांची कारकीर्द चांगली होती. पहिल्याच टर्ममध्ये जेवढी दिल्ली समजून घ्यायला हवी, त्यापेक्षा अधिक त्यांनी समजून घेतली होती. महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत रमतच नाहीत. त्यांचे तसे काही नव्हतेे. ते दिल्लीत बऱ्यापैकी रमत आणि जम बसवत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत संसदेत बोलूही लागले होते. मात्र, गल्लीच्या राजकारणाचा मोह ते सोडू शकले नाहीत. जिल्ह्याचा खासदार जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन जाणारी बस चालवतो आणि गावागावातील सामान्य माणूस याची चर्चा करतो, तेव्हाच कोठेतरी आपला पोरकटपणा झाला, याचा स्वीकार करून दुरुस्तीला वाव द्यायला हवा होता. तो त्यांनी केला नाही. महाडिक गट कधी चुकूच शकत नाही, हा त्यांचा (गैर) समज चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. तसेच थोडे घडत गेले. भाजप गाजराची पुंगी वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली, असेच महाडिक गटाकडे पाहत होता. ज्यांनी विश्वास ठेवला, त्या शरद पवार यांच्याकडे दुर्लक्ष करून महाडिक स्थानिक राजकारणात सर्वांना दुखवत गेले. याचे दोन-तीन बळी महाडिक गटातर्फे गेले. धनंजय महाडिक यांनी याचसाठी शिरोलीत जाऊन विधानसभा निवडणुकीत आपण भाग घ्यायला नको, अशी भूमिका मांडली होती. मात्र महादेवराव महाडिक यांना आपण दिशा फिरवू शकतो, असे तेव्हा वाटत होते. तो काळ आता बदलला आहे, आपणही बदलायला हवे, याची जाणीव झाली नाही.

‘गोकुळ’च्या निमित्ताने झालेले हे राजकारण आहे. ते होतच राहणार आहे.

Web Title: Gokul's politics is over, economy must survive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.