सरताळे कुटुंबियांची जमीन परत देण्याचा ठराव मंजूर
By Admin | Updated: December 24, 2014 23:39 IST2014-12-24T23:39:54+5:302014-12-24T23:39:54+5:30
दिघंचीत विशेष ग्रामसभा : गावात कडकडीत बंद

सरताळे कुटुंबियांची जमीन परत देण्याचा ठराव मंजूर
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील सरताळे कुटुंबियांची जमीन परत मिळावी यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत अमोल मोरे यांनी सरताळे कुटुंबियांची जमीन परत द्यावी, असा ठराव उपसरपंच हणमंतराव देशमुख यांनी मांडला. मात्र ठराव मांडल्यानंतर ग्रामसभेमध्ये वादावादी झाली. दरम्यान, गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
सरताळे कुटुंबियांचे गेले तीन दिवस ग्रामदैवत महादेव मंदिराजवळ बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणास उपसरपंच हणमंतराव देशमुख यांच्यासह विविध संघटना, पदाधिकारी आदींनी पाठिंंबा दिला आहे. आज सकाळी दहा वाजता महादेव मंदिराच्या प्रांगणात ग्रामसभा बोलाविली होती. ग्रामसभेमध्ये एकच ठराव मांडण्यात आला व सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. सभेमध्ये विरोधी कार्यकर्त्यांनी या ठरावावर आक्षेप घेत, पुन्हा एकदा ग्रामसभेत चर्चा करण्याची मागणी केली. ही मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली. यावरून ग्रामसभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर येथील तणाव निवळला.
उपोषणास पाठिंंबा म्हणून सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता गावामध्ये पूर्ण व्यवहार ठप्प होते. पोलिसांच्या आवाहनानंतर दुपारी १२ वाजता दुकाने उघडण्यात आली. तसेच व्यापारी पेठेत व्यवहार पूर्ववत सुरू झाले. (वार्ताहर)