ऊठ शेतकरी राजा, जागा हो, उचल तुझी तलवार!
By Admin | Updated: December 23, 2014 23:51 IST2014-12-23T22:58:31+5:302014-12-23T23:51:19+5:30
हौसाताई पाटील यांची हाक : कडेगावात धरणे आंदोलन

ऊठ शेतकरी राजा, जागा हो, उचल तुझी तलवार!
कडेगाव : ‘उठ शेतकरी राजा उचल तुझी एकजुटीची तलवार, अन्यायाचा कहर झाला, गप्प किती बसणार...’ अशी हाक क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांनी शेतकऱ्यांना ऊस दराच्या लढ्यासाठी दिली. तलवार उचलल्याशिवाय हे सरकार नमणार नाही, ही तलवार उठल्यावर सरकारचे काही खरे नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी सरकारला दिला.
शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे प्रतिटन पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी कडेगाव येथे आज तालुक्यातील शेतकरी व शेतकरी कामगार पक्ष यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील बोलत होत्या. यावेळी शेकाप तालुका सरचिटणीस अॅड. सुभाष पाटील उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, आता शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे प्रति टन पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात मोर्चा नेणार आहे. कारखान्यांनी प्रति टन १९00 रुपये उचल जाहीर केली आहे. ही उचल अन्यायकारक असून ती शेतकऱ्यांना मान्य नाही. शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यापासून कारखान्यांनी १४ दिवसांच्या आत एफआरपीप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. परंतु सरकार हा कायदा अंमलात आणत नाही. सरकारचे कान धरण्याची वेळ आली असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी परशुराम माळी, संदीप महाडिक, इंद्रजित पाटील, दमयंती पाटील, जगन्नाथ मोरे, पोपट म्हस्के, सतीश मोरे, अॅड. शौर्या पवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
बारा धान्यांचे धपाटे
भाजप सरकार हे १२ धान्यांचे धपाटे झाले. पण हे धपाटे आता पचेनासे झाले आहे. त्यांनी आता शेतकऱ्यांचेच धपाटे करायचे ठरवले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या कानात घुसेनात, म्हणून आता सरकारचे कान धरले पाहिजेत. म्हणूनच आता शेतकऱ्यांना लढ्यासाठी प्रवृत्त करणार आहे.