दानशूर व्यक्तिमत्त्व : शिवलिंग शेटे (अण्णा)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:48+5:302021-03-14T04:24:48+5:30
—————————————- स्वातंत्र्यसैनिक शिवलिंग शेटे (अण्णा) यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी ऐतवडे खुर्द येथे गरीब कुटुंबात झाला. क्रांतिसिंह नाना ...

दानशूर व्यक्तिमत्त्व : शिवलिंग शेटे (अण्णा)
—————————————-
स्वातंत्र्यसैनिक शिवलिंग शेटे (अण्णा) यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी ऐतवडे खुर्द येथे गरीब कुटुंबात झाला. क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव हाेता. यातूनच ते प्रतिसरकारच्या चळवळीत सक्रिय सहभागी झाले. प्रतिसरकारच्या चळवळीत क्रांतिकारकांना रसद पुरविण्यात त्यांचा सहभाग हाेता. त्यामुळे त्यांना एक वर्षाचा कारावासही झाला होता. स्वातंत्र्यानंतर काही काळ त्यांनी किराणा दुकानात नोकरी केली. नोकरी करत व्यवसायास सुरुवात केली. सचोटी व कार्यतत्परता या जोरावर व्यवसायात प्रचंड प्रगती केली. एक निस्सीम शिवभक्त व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची भागात ओळख होती. व्यवसाय करीत असताना त्यांनी नेहमीच कामगारांना आपलेपणाने वागविले. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत मदत केली. त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण दिले. त्याकाळी त्यांनी गावातील व नातेवाइकांच्या गरीब व होतकरू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यापैकी अनेक जण आज उच्च पदावरून निवृत्त झाले आहेत. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे व सहकाररत्न बाजीराव बाळाजी पाटील यांचे ते सहकारी होत. बऱ्याच गरजू लोकांना त्यांनी मदतीचा हात दिला.
स्वत: २० लाख रुपये खर्च करून गावातील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतर धार्मिक स्थळांनाही मदत केली. १९६० पासून कापड, किराणा, हार्डवेअर, बांधकाम साहित्य आदी व्यवसायांमध्ये जम बसविला. आधुनिक तंत्राची कास धरून शेतीही केली. शिवलिंगअण्णा स्वत: कुस्तीगीर हाेते. ते स्वत: खेळत व इतरांनाही प्रोत्साहित करत. या कार्यामुळे पंचक्राेशीत त्यांचा माेठा लाैकिक हाेता. गावामध्ये लग्नातील याद्या लिहिण्याचा मान नेहमीच अण्णांकडे असे. काेणत्याही शुभकार्यात आर्थिक कारणामुळे अडचण आल्यास अण्णा स्वत: आर्थिक मदत करत. साधे राहणीमान, कोणतेही व्यसन नाही, आयुष्याच्या शेवटपर्यंत दररोज दूध घेणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होत. तरुण पिढीला उच्चशिक्षण मिळावे, यासाठी ते शेवटपर्यंत आग्रही होते. त्यांच्या विचारांची पिढी घडविणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
चाैकट
आरबीआयचा अधिकारी घडला अण्णांच्या तालमीत
अंबप येथील गणपतराव कार्वेकर यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना सर्व शैक्षणिक मदत केली. गणपतराव कार्वेकर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले आहेत. असे अनेक लोक त्यांनी घडविले.
- महेंद्र शेटे