सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार, उपमहापौरपदी देवमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:49 IST2020-02-07T14:47:22+5:302020-02-07T14:49:56+5:30
नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात शुक्रवारी यश मिळविले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या ४३ विरूद्ध ३५ मतांनी पराभव केला. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला. तर आघाडीचा चमत्काराचा दावा फोल ठरला.

सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार, उपमहापौरपदी देवमाने
सांगली : नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात शुक्रवारी यश मिळविले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या ४३ विरूद्ध ३५ मतांनी पराभव केला. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला. तर आघाडीचा चमत्काराचा दावा फोल ठरला.
शुक्रवारी सकाळी भाजपच्या नगरसेवकांना कोल्हापूरातून थेट महापालिकेत निवडीसाठी आणण्यात आले. तर कांँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्रितच महापालिकेत आले. वसंतदादा पाटील सभागृहात साडेअकरा वाजता महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली.
सुरूवातीला महापौरपदासाठी दाखल अर्जाची छाननी झाली. यात राष्ट्रवादीच्या मालन हुलवान यांचा अर्ज अवैध ठरला. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले नव्हते. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपच्या गीता सुतार व काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांच्या लढत झाली.
हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात सुतार यांना ४३ तर निंबाळकर यांना ३५ मते मिळाली. त्यानंतर उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी काँग्रेसच्या मनोज सरगर यांनी अर्ज मागे घेतला.
उपमहापौरपदासाठी भाजपचे आनंदा देवमाने व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात रिंगणात होते. यात देवमाने यांना ४३ तर थोरात यांना ३५ मिळाली. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत एकच जल्लोष केला.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, सुयोग सुतार, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी नूतन महापौर, उपमहापौरांचा सत्कार केला.