कवठेपिरानमध्ये गॅस्ट्रोसदृश साथ
By Admin | Updated: August 24, 2014 23:17 IST2014-08-24T22:46:34+5:302014-08-24T23:17:02+5:30
पंचवीस रुग्ण : दूषित पाणी

कवठेपिरानमध्ये गॅस्ट्रोसदृश साथ
सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथील गायकवाड गल्लीत जलवाहिनीला गळती लागल्याने सांडपाणी मिसळून २५ जणांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ५० जणांचे पथक याठिकाणी दाखल झाले असून, आता परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी दिली.
गायकवाड गल्लीत एकूण १२६ घरे असून ६०० लोकवस्ती आहे. याठिकाणी जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे सांडपाणी त्यामध्ये मिसळले. त्यामुळे येथील नागरिकांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली. माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पन्नासजणांचे पथक याठिकाणी दाखल झाले. शनिवारी रात्री व रविवार सायंकाळपर्यंत पथक राबत होते. २१ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले असून, ४ रुग्णांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डॉ. हंकारे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनीही याबाबतची माहिती घेतली. आरोग्य विभागाला त्यांनी तातडीने उपाययोजनांचे आदेश दिले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली. तरीही आरोग्य विभाग अजूनही कवठेपिरान येथे राबत आहे. यावर लवकरच नियंत्रण आणू, असा दावा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)