गॅस्ट्रो साथीमुळे मिरजेत एकच बळी?

By Admin | Updated: December 19, 2014 00:18 IST2014-12-18T23:31:39+5:302014-12-19T00:18:34+5:30

६८२ रुग्णांवर उपचार : महापालिका प्रशासनाची शासनाला माहिती

Gastro Patience: One of the victims? | गॅस्ट्रो साथीमुळे मिरजेत एकच बळी?

गॅस्ट्रो साथीमुळे मिरजेत एकच बळी?

मिरज : गॅस्ट्रो साथीने मिरजेत सुमारे १४ जणांचा बळी गेला; मात्र महापालिका प्रशासनाने आनंदा पारिसा कांबळे (रा. समतानगर) या एकाच रुग्णाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. गॅस्ट्रोच्या ६८२ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने शासनाला दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीमुळे अनेकांचा बळी गेला. दूषित पाण्याने हजारो नागरिकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी विधानसभा अधिवेशनात मिरजेतील गॅस्ट्रो साथीत किती बळी गेले व महापालिकेने काय उपाययोजना केल्या? हा प्रश्न उपस्थित केला आहे. विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्याने नगरविकास विभागाने महापालिकेकडून माहिती मागितली आहे. महापालिका आरोग्य विभागाने ‘कॉलऱ्या’ची लागण झाल्याने मिरजेत आनंदा कांबळे यांचा एकच बळी गेला व ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मिरजेत एकूण ६८२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. गॅस्ट्रोची साथ रोखण्यासाठी शहरात रुग्णांचे सर्वेक्षण करून उपचार करण्यात आले. मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले. जुन्या जलवाहिन्या धुऊन काढण्यात आल्या. जुन्या जलवाहिन्यांव्दारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ३१० ठिकाणी जलवाहिन्यांची गळती काढण्यात आली. पाणी अशुध्द आढळलेल्या ठिकाणी जलवाहिन्यांची दुरूस्ती करून पाणी उकळून, गाळून पिण्याबाबत जनजागृती व प्रबोधन केल्याची माहिती देऊन अद्याप रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, साथ आटोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभेत माहिती देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यास नागपूरला पाठविण्यात आले नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


फौजदारीची २९ ला सुनावणी
शहर सुधार समितीने गॅस्ट्रोप्रकरणी महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्यावर दाखल केलेल्या फौजदारी खटल्याची सुनावणी २९ डिसेंबर रोजी मिरज न्यायालयात होणार आहे. महापालिकेने म्हणणे सादर केले नसल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे. म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याची पाठवलेली नोटीस मिरज शहर पोलिसांऐवजी चुकून सांगली शहर पोलिसांकडे गेल्याने अद्याप महापालिकेला नोटीस बजाविण्यात आलेली नाही, असे शहर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितले. आता पुन्हा नव्याने महापालिका आयुक्तांना नोटीस काढून शहर सुधार समितीचे पदाधिकारी स्वहस्ते पोलिसांकडे देणार आहेत.

Web Title: Gastro Patience: One of the victims?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.