पेट्रोल, डिझेलच्या दराने किचन कोलमडले, किराणा, भाजीपाला महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:05+5:302021-07-05T04:17:05+5:30
सांगली : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईने उच्चांकी पातळी गाठली आहे. गृहिणींच्या किचनचे बजेट तर पुरते ...

पेट्रोल, डिझेलच्या दराने किचन कोलमडले, किराणा, भाजीपाला महागला
सांगली : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईने उच्चांकी पातळी गाठली आहे. गृहिणींच्या किचनचे बजेट तर पुरते कोलमडून पडले आहे. गेल्या सहा महिन्यांत पेट्रोलच्या दरात १२ रुपयांची तर डिझेलच्या दरात १३ रुपयांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे किराणा मालासह भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे. त्यात सततच्या लाॅकडाऊनमुळे हाताला रोजगारही उरलेला नाही. अशातच महागाई भडकल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंडईत भाजीपाला आणण्यासाठी गेल्यास १०० रुपयांत पिशवी भरूनही भाजी येत नाही. दोनशे ते अडीचशे रुपयांची भाजी खरेदी केली तर ती आठवडाभरही पुरत नाही. भाजीपाल्याचे दर ऐकूनच गृहिणींना घाम सुटतो आहे. दुसरीकडे किराणा मालाचे दरही गगनाला भिडले आहेत. खाद्यतेलाने उच्चांकी पातळी गाठली. त्यात आता कुठे शासनाने खाद्यतेलाचे दर कमी केल्याने थोडा दिलासा मिळाला असला, तरी सध्याचे दर आवाक्याबाहेरीलच आहेत. भाजीपाला परवडत नाही, किराणा माल महागला आहे. मग दोनवेळचे खायचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला असून, महागाईवर नियंत्रण आणण्याकडे जनतेचे डोळे लागले आहेत.
चौकट
फ्लाॅवर ६० ते ८० रुपये किलो
सांगलीच्या मंडईत फ्लाॅवरचा दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आहारात भाज्यांचा वापर कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. तर पत्ता कोबी ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. पालेभाज्याही महागल्या आहेत. मेथी, पालक, चाकवत, शेपूसह सर्वच पालेभाज्यांचा दर १५ ते २० रुपये पेंडी आहे.
चौकट
ट्रॅक्टर शेतीही महागली
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कालानुरुप तंत्रज्ञानाचाही स्वीकार केला आहे. सध्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जातो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे मशागतीचे दरही वाढले आहेत. वर्षभरात पलटी, रोटर, सरी सोडण्याचे दर ५०० ते १००० रुपयांनी वाढले आहेत. सध्या सरासरी एकरी दोन हजार रुपयांपर्यंतचा खर्च होत आहे.
चौकट
डाळ स्वस्त, तेल महाग
१. खाद्यतेलाच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या १४० ते १७० रुपये किलो दराने खाद्यतेलाची विक्री होत आहे.
२. तेलापेक्षा डाळी थोड्याफार स्वस्त आहेत. तूर, मूग, उदीड डाळ ८० ते १०० रुपये किलो आहे. तर उदीड डाळ मात्र त्यापेक्षा महाग आहे.
३. भाजीपाला, तेल महागल्याने गृहिणींनी डाळीला पसंती दिली असली तरी त्याचे दरही अधिक आहेत.
चौकट
भाजीपाल्याचे दर
बटाटा : २५
शेवगा - १२०
वांगी - १००
कांदे - ४०
टोमॅटो - २०
चौकट
व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया
कोट
- भाजीपाल्याचे दर हे बाजारातील आवकेवर अवलंबून असतात. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थोडाफार परिणाम होतो. बाजारात आवक वाढल्यास भाजीपाला स्वस्त होतो तर आवक कमी झाल्यास दर वाढतो. - सागर पाटील, भाजी विक्रेता
- कोरोनामुळे वर्षभरापासून किराणा व्यापार अडचणीत आहे. त्यात महागाई वाढल्याने ग्राहकही पूर्वीसारखे सर्वच वस्तू खरेदी करत नाहीत. मोजकेच व आवश्यक तेवढेच साहित्य खरेदी करतात. महागाई वाढल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. - दादासाहेब पाटील, किराणा व्यापारी
-------
चौकट
घर चालविणे झाले कठीण
- पेट्रोल - डिझेलचे दर वाढल्याने किराणा, भाजीपाला महागल्याचे व्यापारी सांगतात. पूर्वी किराणा माल आणताना हात सैल सोडत होते. पण आता मात्र मोजकेच साहित्य खरेदी करावे लागते. स्वयंपाक घराचे बजेटच कोलमडून गेले आहे. दररोज जेवणात काय करायचे, असा प्रश्न पडतो. - सुमन पाटील, गृहिणी
- भाजीपाला, किराणा साहित्य महागल्याने नेमके काय खायचे? असा प्रश्न पडला आहे. मंडईत गेल्यावर भाज्यांचे दर ऐकताच कोणती घ्यावी, कोणती नको, हेच समजत नाही. महागाईने सर्वसामान्य जनतेच्या तोंडचा घासच हिसकावून घेतला आहे. - स्वप्नाली देसाई, गृहिणी
चौकट
महिना पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१८ ७८.४४ ६३.६५
जानेवारी २०१९ ७४.५७ ६४.४६
जानेवारी २०२० ८१.४९ ७१.२५
जानेवारी २०२१ ९३.०५ ८२.२५
फेब्रुवारी २०२१ ९७.४८ ८७.४२
मार्च २०२१ ९७.९३ ८७.६२
एप्रिल २०२१ ९७.३४ ८६.९९
मे २०२१ १००.९४ ९१.५१
जून २०२१ १०४.९३ ९५.२८
जुलै २०२१ १०५.५९ ९५.६४