मिरज : कोल्हापूर रस्त्यावर मिरजेच्या गांधी चौक पोलिसांनी अरबाज शफिक पटेल (वय ४०, रा. म्हैसाळ रोड, चाँद कॉलनी, मिरज) या गांजा तस्कराला पकडून ४२ हजार ५०० रुपये किमतीचा एक किलो ७०० ग्रॅम गांजा हस्तगत केला. अरबाज शफिक पटेल याला पोलिसांनी अटक केली त्यांचा साथीदार अल्ताफ ऊर्फ बाबा जमादार हा फरार झाला. या आठवड्यातील गांधी चौक पोलिसांची ही गांजावरील दुसरी कारवाई आहे.मिरजेतील कोल्हापूर रस्त्यावर खतीब हॉलजवळ पुलाखाली एकजण गांजा विक्रीसाठी आल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित अरबाज पटेल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा साठा हस्तगत केला. हा गांजा हा अल्ताफ ऊर्फ बाबा जमादार याच्याकडून आणून किरकोळ विक्री व वितरण करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.अरबाज याच्याकडून गांजा व दुचाकी, असा ९२ हजार ५१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, अभिजित पाटील, नाना चंदनशिवे यांनी ही कारवाई केली.
Sangli: मिरजेत आणखी एका गांजा तस्कराला अटक, एक किलो ७०० ग्रॅम माल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:22 IST