सांगली : मोरबगी (ता. जत) येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखाच्या मुद्देमाल लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून मात्र २ कोटी ४९ लाख ८८ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. सराफाच्या फिर्यादीत तीन लाखाची रोकड नमुद असताना मिळालेली अडीच कोटीची रोकड नेमकी कोणाची? असा प्रश्न पडला आहे. आयकर विभागाला याबाबत कळवले असून उमदी पोलिसही याचा तपास करत आहेत.
दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित रवी तुकाराम सनदी (वय ४३, रा. माळी वस्ती उमदी), अजय तुकाराम सनदी (वय ३५, रा. माळी वस्ती, उमदी, सध्या रा. गोकुळ पार्क, विजयपूर), चेतन लक्ष्मण पवार (वय २०, इंडी रस्ता, विजयपूर), लालसाब हजरत होनवाड (वय २४), आदिलशाह राजअहमद अत्तार (वय २७, रा. उमदी), सुमित सिद्धराम माने (वय २५, रा. पोखर्णी, ता. उत्तर सोलापूर), साई सिद्धू जाधव (वय १९, रा. उमदी) या सातजणांना अटक केली आहे. त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या तपासाबाबत अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, उमदी (ता. जत) येथील सराफ अनिल अशोक कोडग हे दि.१४ रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास सराफ कोडग हे चालक सिद्धू जाधव याला घेऊन विजयपूर येथे निघाले होते. मोरबगी येथील पुलाजवळ दरोडेखोरांच्या टोळीने मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवला. दोघांना मोटारीतून बाहेर काढले. मारहाण करत सोन्याची अंगठी, तीन लाखाची रोकड, साडे सहा लाखाची मोटार, तीन हजाराचा मोबाईल असा सुमारे दहा लाखाचा ऐवज घेऊन पलायन केले. कोडग यांनी याबाबत उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दरोड्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व उमदी पोलिसांचे पथक तयार केले.
तांत्रिक माहिती व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून तीन संशयित कोंत्येवबोबलाद (ता.जत) येथील विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्तीवर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रवी सनदी, अजय सनदी, चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर मोरबगी गावाजवळ सराफाला लुटल्याची कबुली दिली. या दरोड्यातील आणखी काही संशयित उमदी येथील चडचण रस्त्यावरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन लालसाब होनवाड, आदिलशाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या चौघांना अटक केली. त्यांनीही दरोड्याची कबुली दिली.
संशयितांची चौकशी करताना अजय सनदी याने चोरीचा मुद्देमाल विजयपूर येथील घरात ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने कर्नाटकात जाऊन सनदीच्या घराची झडती घेतली. तेव्हा बेडमध्ये तब्बल २ कोटी ४९ लाख ८८ हजार रूपये मिळाले. तसेच सराफ कोडग यांची मोटारही जप्त केली.
यावेळी अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक सुनिल साळुंखे, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे उपस्थित होते.
आयकर विभागाकडून चौकशी
अधीक्षक घुगे म्हणाले, फिर्यादी कोडग यांनी तीन लाखाची रोकड लुटल्याची तक्रार दिली होती. प्रत्यक्षात तपासात २ कोटी ४९ लाख ८८ हजार रूपये मिळाले. या रकमेबाबत फिर्यादी व संशयितांनी कोणतेही विवरण दिले नाही. त्यामुळे आयकर विभागाला कळवले आहे. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासानुसार याच गुन्ह्यातील रोकड असण्याची शक्यता आहे.
‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
सराफ कोडग यांच्या चालकाचा मुलगा साई जाधव याला त्याचे वडील मोटारीतून पैसे घेऊन जातात, याची माहिती होती. त्याने कोडग यांचे ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवले होते. त्यानुसार त्यांनी पुलावर पाळत ठेवून दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आणखी रोकडची शक्यता
दरोडा टाकणाऱ्या टोळीकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता आहे. टोळीने पूर्व नियोजित कट रचून दरोडा टाकला आहे. पोलिस कोठडीतील तपासात त्यांची कसून चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले.
यांच्या पथकाची कारवाई
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, सायबरच्या सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, उपनिरीक्षक बंडू साळवे, कर्मचारी नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागणे, सागर टिंगरे, अमर नरळे, सतीश माने, सागर लवटे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, संदीप नलावडे, उदय माळी, सोमनाथ गुंडे, शिवाजी शिद, गणेश शिंदे, संतोश माने, कपिल काळेल, आगतराव मासाळ, साेमनाथ पोटभरे, इंद्रजित घोदे, कावेरी मोटे, म्हेत्रे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर यांनी कारवाईत भाग घेतला.