सांगली : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोरयाच्या गरजात जिल्ह्यात ३००हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रींचे विसर्जन करण्यात आले. मिरजेत विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तास सुरू होती. किरकोळ वादावादाची प्रकार वगळता जिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.सांगलीत ४९ सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. मिरजेत शनिवारी सकाळी मिरवणुकीला सुरूवात झाली. रविवारी दुपारी २ वाजता तब्बल ३० तासांनंतर विसर्जन सोहळ्याचा समारोप झाला. मिरवणुकीत अनेक मंडळांनी जोरदार डीजेचा दणदणाट केला. तर अनेक मंडळांनी पारंपरिक टाळ-मृदंग, ढोल-ताशा, झांज, लेझीम, बेंजो, बँड अशा पारंपरिक वाद्यांसह काढली. मिरजेत मिरवणुकीत उद्धवसेनेच्या स्वागत कक्षासमोर एकनाथ शिंदे यांचे गौरवगीत वाजविल्यामुळे दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यामध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यात बाचाबाची झाली. शिराळा तालुक्यात डीजेमुक्त मिरवणुका काढण्यात आल्या. विटा शहरातही मोठ्या उत्साहात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
डीजेचा दणदणाट, टाळ मृदुंग, ढोल-ताशांचा गजर; सांगलीत १२ तास, तर मिरजेत ३० तास विसर्जन मिरवणुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:02 IST