गांधी, नेहरुंची विचारधाराच भारताला तारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:36+5:302021-07-05T04:17:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गांधी, नेहरुंच्या त्यागातून भारताचा चौफेर विकास झाला. राष्ट्रीय ऐक्य, सत्य व अहिंसा या त्यांनी ...

गांधी, नेहरुंची विचारधाराच भारताला तारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गांधी, नेहरुंच्या त्यागातून भारताचा चौफेर विकास झाला. राष्ट्रीय ऐक्य, सत्य व अहिंसा या त्यांनी दिलेल्या तत्त्वांचा अंगिकार करुन काँग्रेस सेवा दल कार्यरत आहे. हे विचारच देशाला तारणारे आहेत, असे मत अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव बलराम भरौदीया यांनी व्यक्त केले.
भरौदीया रविवारी सांगलीत आले होते. काँग्रेस भवनमध्ये पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस सेवा दल व पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी भरौदीया म्हणाले, भ्रष्टाचार निर्मूलन, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, महागाईविरोधी आंदोलन, राष्ट्रीय ऐक्य व बंधुभाव संवर्धनकामी काँग्रेस आणि सेवा दलाची कामगिरी श्रेष्ठ दर्जाची आहे. सांगली काँग्रेसने व सेवा दल साथींनी केलेले काम अत्यंत चांगले आहे. समर्पित, निष्ठावान कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेस व सेवा दलाच्या माध्यमातून खूप मोठी देशसेवा केली आहे. यामध्ये सांगली आणि महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी प्रा. एन. डी. बिरनाळे व अनिल सुगाण्णावर यांच्या हस्ते भरौदीया यांचा सुती हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत तर उपाध्यक्ष पैगंबर शेख यांनी प्रास्ताविक केले. अशोक वारे यांनी आभार मानले.
यावेळी देशभूषण पाटील, सुरेश पाटील, नामदेव पठाडे, शिवानंद तेलसंग, संगाप्पा पाटोळे, हणमंत वडेर, बाळासाहेब खोत व सुकुमार पोतदार उपस्थित होते.