सांगलीत मैत्रिपूर्ण लढत, बंडखोरी की उद्धवसेनेला साथ?; काँग्रेसची आज बैठक 

By अविनाश कोळी | Published: April 8, 2024 01:21 PM2024-04-08T13:21:40+5:302024-04-08T13:22:28+5:30

सांगलीच्या जागेबाबत भूमिका जाहीर करणार

Friendly fight, rebellion or support of Uddhavasena in Sangli Lok Sabha Constituency | सांगलीत मैत्रिपूर्ण लढत, बंडखोरी की उद्धवसेनेला साथ?; काँग्रेसची आज बैठक 

सांगलीत मैत्रिपूर्ण लढत, बंडखोरी की उद्धवसेनेला साथ?; काँग्रेसची आज बैठक 

अविनाश कोळी

सांगली : संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत व उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांच्याकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली जाणार आहे. ती नेमकी भूमिका काय, मैत्रिपूर्ण लढत, बंडकोरी की उद्धवसेनेला साथ ? यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

सांगलीची उमेदवारी उद्धवसेनेने परस्पर जाहीर करून प्रचाराला सुरूवात केली, तरी काँग्रेसने अद्याप या जागेवरील दावा सोडलेला नाही. काँग्रेसच्या राज्याच्या तसेच दिल्लीतील नेत्यांमध्येही या जागेवरून बरीच चर्चा झाली आहे. जागेचा तिढा सोडविण्यात कोणालाही यश आले नाही. निवडणूक जवळ येत असल्याने हा वाद मिटावा म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष या भूमिकेकडे लागले आहे.

मैत्रिपूर्ण लढतीचा तर्क

काँग्रेस मैत्रिपूर्ण लढत जाहीर करण्याची शक्यता अनेक दिवसांपासून वर्तविली जात आहे. मैत्रिपूर्ण लढतीचा मुद्दा उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोडून काढला आहे. अशाप्रकारे राज्यभर मैत्रिपूर्ण लढती होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या लढतीचे परिणाम राज्यातील अन्य मतदारसंघांवरही होतील, असा अंदाज मांडला जात आहे.

उमेदवारी बदलाविषयी चर्चा

उद्धवसेनेचा उमेदवार बदलून काँग्रेसचा उमेदवार दिला, तर त्याचे महाविकास आघाडींतर्गत काय परिणाम होतील, असाही अंदाज व्यक्त होतोय. उद्धवसेना अशी नामुष्की नको म्हणूनच त्यांच्या निर्णयावर ठाम आहे, असा तर्क लावला जातोय.

..तर उद्धवसेनेला पाठिंबा द्यावा लागणार ?

काँग्रेस किंवा इंडिया आघाडीच्या स्तरावर उद्धवसेनेला ही जागा सोडण्याचा निर्णय झाला, तर स्थानिक नेत्यांनाही त्याप्रमाणे उमेदवार मान्य करून प्रचार करावा लागेल, अशी शक्यताही राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होतेय.

बंडखोरी झाली तर..

काँग्रेसकडून दावेदार असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यास काँग्रेसच्या नेत्यांना त्यांना पाठबळ देणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे बंडखोरीचे पाऊल सांगली मतदारसंघात उचलले गेले, तर अनेक राजकीय उलथापालथी होऊ शकतात, असा अंदाजही व्यक्त होतोय.

Web Title: Friendly fight, rebellion or support of Uddhavasena in Sangli Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.