कुपवाड : कुपवाड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील झुडपात किरकोळ कारणातून एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना गुरुवार, दि. ७ रोजी सकाळी उघडकीस आली. मयूर सचिन साठे (वय २४, रा. सोनी, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे.हल्लेखोर प्रताप राजेंद्र चव्हाण (वय २४, रा. सोनी, ता. मिरज) हा गुरूवारी सकाळी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक केली. रात्री पार्टीमध्ये झालेल्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयूर साठे व प्रताप चव्हाण हे दोघेही सोनी (ता. मिरज) या गावात राहतात. ते दोघे जिवलग मित्र होते. प्रताप हा कुपवाडजवळील संजय औद्योगिक वसाहतीमधील एका चहा कंपनीत रखवालदार म्हणून काम करत होता. तर मयूर हा गावात हातभट्टी दारूची विक्री करत असल्याचे समजते. बुधवारी सकाळपासून दोघेही एकत्र दुचाकीवरून फिरत होते. भोसे (ता. मिरज) येथील महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये रात्री पार्टी केली. त्यानंतर दोघेही दुचाकीवर बसून कुपवाड एमआयडीसीत आले.त्यानंतर महावितरणच्या समोरील रस्त्यालगत असलेल्या गटारावरील झुडपात दोघेही गप्पा मारत बसले होते. यावेळी पुन्हा दोघांत वादावादी झाली. प्रताप याने वादावादीतून जवळच पडलेला दगड उचलून मयूरच्या डोक्यात, तोंडावर मारल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मयूर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित प्रताप हा फरार झाला. दरम्यान, गुरूवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस तपास करत आहेत.
Sangli Crime: पार्टीतील वादातून मित्राचा डोक्यात दगड घालून खून, कुपवाडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:51 IST