राज्यातील गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:01+5:302021-05-07T04:29:01+5:30
कुपवाड : राज्यातील गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयात जागा नसल्यामुळे खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. पण पैशाअभावी ...

राज्यातील गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत
कुपवाड : राज्यातील गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयात जागा नसल्यामुळे खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. पण पैशाअभावी खासगी सेवा परवडत नसल्याने अनेक गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशप्रमाणे या राज्यातील सर्व गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा संपूर्ण मोफत पुरविण्यात याव्यात अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
प्रा. पाटील पुढे म्हणाले, कोरोना महामारीत गोरगरिबांचा जीव वाचविणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार केले जातील असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा संपूर्ण मोफत पुरविण्यात याव्यात. त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. अनेक कुटुंबांनी कोरोनामुळे घरातील कर्त्या व्यक्ती गमावल्या आहेत. अशा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग व रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्यातील सर्व बेड्स, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्स ही संख्या अपुरी पडू लागली आहे. शासकीय रुग्णालयात सेवा मोफत आहेत. पण प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयात जागा नाही. अनेक गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. त्यांना लाखो रुपये फी परवडत नाही अशा गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ऑक्सिजन व व्हेंटीलेटरअभावी अनेक मृत्यू होत आहेत. वास्तविक कोरोना महामारी ही जागतिक असाधारण आपत्ती आहे. सर्व रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठी त्वरित निर्णय घेेेेेेऊन योग्य ते आदेश देण्यात यावेत व अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.