लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रोजगारासाठी शहरांकडे धाव घेणारी लोकसंख्या दररोज नवनव्या प्रश्नांना जन्म देत आहे. निवासी जागांची समस्या ही त्यापैकीच एक ठरत आहे. यातून भूखंडमाफियांचा उदय होत असून गुन्हेगारीला चालना मिळू लागली आहे.
सांगलीसह मिरज, कुपवाड, इस्लामपूर, विटा, खानापूर, कडेगाव ही काही वेगाने वाढणारी शहरे आहेत. या ठिकाणी जागांचे भाव गगनाला भिडत आहेत. म्हैसाळ, पलूस, वाळवा, भिवघाट, कवठेमहांकाळ, तासगाव, आष्टा अशा काही सधन व वेगाने विकसित होणाऱ्या गावांत जागांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. या ठिकाणी जागांमधील गुंतवणूक अल्पावधीतच गर्भश्रीमंत करणारी ठरत आहेत. शहरांलगतचे शेतकरी शेतीचे प्लॉटिंग करून कोट्यवधी रुपये मिळवत आहेत. या पैशांच्या झगमगाटाने माफियेगिरी व गुन्हेगारीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातूनच फसवणूक, सावकारी, जबरदस्तीने कब्जेपट्टी, प्रसंगी खून अशा गुुन्हेगारीला चालना मिळत आहे.
विटा, खानापूर, कडेगावसारख्या काही शहरांत गलई व्यवसायातील पैशांची गुंतवणूक जागांमध्ये केली जात आहे, त्यामुळेही जागांना सोन्याचे भाव आले आहेत. अशा शहरांतही फसवणुकीचे प्रमाण प्रचंड आहे.
बॉक्स
सावकारीतून भूखंड हडपले
सावकारीच्या माध्यमातून प्लॉट हडपण्याचे प्रकार जास्त आहेत. भरभक्कम व्याजदराने पैसे द्यायचे आणि वसुलीसाठी प्लॉट ताब्यात घ्यायचा असे प्रकार सांगली, मिरजेत सर्रास होतात. घराच्या स्वप्नासाठी पै पै जमवून घेतलेल्या जागा सावकारांच्या घशात अलगद जातात.
बॉक्स
- पोलीस ठाण्यात अशा तक्रारींची दखल फसवणूक या सदराखाली घेतली जाते. उपअधीक्षकांच्या मान्यतेने गुन्हा दाखल केला जातो.
- खटला न्यायालयात जातो, पण गुन्ह्यातील बराचसा भाग महसुली कागदपत्रांशी निगडित असल्याने खटला वर्षानुवर्षे लांबतो.
- सर्रास गुन्ह्यात फिर्यादी आणि संशयित यांच्यात पोलीस ठाण्याबाहेरच तडजोड होत असल्याचे पोलिसांचे अनुभव आहेत. पैसे अडकलेला फिर्यादी मिळतील तितक्या रकमेवर समाधान मानून प्लॉटवर पाणी सोडत असल्याचे अनुभव आहेत.
बॉक्स
फसवणुकीचे काही नवे फंडे
एकच प्लॉट अनेकांना विकण्याचा फंडा बराच जुना आहे. अशा घटना वारंवार उघडकीस येऊनही प्रकार थांबलेले नाहीत. गुंठेवारी भागात असा प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो. गुंठेवारीची नोंद शासकीय दप्तरी होत नसल्याने एकाच जागेची विक्री अनेकांना करून पैसे मिळविले जातात. संबंधित जागेवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होते, तेव्हाच त्याचे एकापेक्षा जास्त मालक समोर येतात.
जागेत काटामारीचा नवा फंडाही सध्या जोरात आहे. उताऱ्यावर चार हजार चौरस फूट असणारी जागा प्रत्यक्ष विक्री करताना मात्र २००-३०० चौरस फुटांनी कमीच दिली जाते. एकरामागे दोन-तीन गुंठ्यांचा एखादा प्लॉट अलगद बाहेर काढला जातो. जागा नावावर करून घेतल्यानंतर बांधकाम सुरू होते, तेव्हा ही बाब लक्षात येते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
कोट
२०१६ मध्ये मिरजेत गुंठेवारीत तीन गुंठे जागा घेतली. महापालिकेकडून प्लॉट बिगरशेती करूनही घेतला. बांधकाम सुरू करतेवेळी आणखी एक मालक पुढे आला. त्यामुळे या एकाच जागेची दोघांना विक्री केल्याचे स्पष्ट झाले. आता कागदोपत्री माझे नाव असल्याने पहिल्या मालकाला फसवणुकीला तोंड द्यावे लागले आहे.
- दशरथ ऐगळी, समतानगर, मिरज.