शालेय क्रीडा स्पर्धेतील चार खेळ वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: August 22, 2015 00:52 IST2015-08-22T00:52:33+5:302015-08-22T00:52:33+5:30
स्पर्धा आयोजनास स्थगिती : क्रीडा विभागाचा निर्णय; सायकलिंग-तायक्वांदोचा समावेश

शालेय क्रीडा स्पर्धेतील चार खेळ वादाच्या भोवऱ्यात
सांगली : शालेय क्रीडा स्पर्धेतील चार खेळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामध्ये सायकलिंग, तायक्वांदो, किक बॉक्सिंग व चायक्वांदो या खेळांचा समावेश आहे. संघटनांमधील वादाचा फटका या खेळांना बसला आहे. यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये या चार खेळांच्या स्पर्धा आयोजनास राज्याच्या क्रीडा संचालनालयाने स्थगिती दिली आहे.
या स्थगिती आदेशाचे परिपत्रक क्रीडा संचालनालयाने १२ आॅगस्ट २०१५ रोजी काढले असून, त्यावर क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे यांची स्वाक्षरी आहे. राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक व सर्व जिल्हा क्रीडाधिकारी यांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, सायकलिंग, तायक्वांदो, किक बॉक्सिंग व चायक्वांदो या खेळांच्या राज्यस्तरावर दोन-दोन समांतर संघटना आहेत. दोन्ही संघटनांकडून ‘आम्ही अधिकृत असून, शालेय स्पर्धेसाठी तांत्रिक सहकार्य आमच्या संघटनेकडून घेण्यात यावे’ अशी विनंतीपत्रे क्रीडा संचालनालयास सादर करण्यात आली आहेत. वाद असलेल्या खेळांच्या एकविध संघटनांपैकी अधिकृत संघटना कोणती, याबाबत निर्णय घेण्यास काही कालावधी लागणार आहे.
संघटनांच्या वादामुळे स्पर्धेचे आयोजन विस्कळीत होऊन त्याचा परिणाम खेळाडूंवर होऊ नये, यासाठी वरील चारही खेळांचे स्पर्धा आयोजन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
नियंत्रणच नाही...
शालेय क्रीडा स्पर्धेत पूर्वी केवळ वीस पंचवीस खेळच असायचे. हळूहळू या खेळांची संख्या वाढत जाऊन आज ती ८१ पर्यंत पोहोचली आहे. बऱ्याच खेळांची नावे, नियम आणि साहित्याचीदेखील खेळाडू व प्रशिक्षकांना माहिती नाही. राज्यात एकाच खेळाच्या दोन दोन समांतर संघटना निर्माण झाल्यामुळे शासनाला कोणती संघटना अधिकृत, याचा पेच पडला आहे. एकविध खेळांच्या राज्य संघटनांवर शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही, त्यामुळेच हा प्रश्न उद्भवला असल्याचे मत क्रीडा प्रशिक्षकांनी व्यक्त केले.