चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:01+5:302021-06-28T04:19:01+5:30
सांगली : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसास पुन्हा सुरुवात झाली आहे. दुष्काळी भागात पावसाने हजेरी लावली असून ...

चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज
सांगली : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसास पुन्हा सुरुवात झाली आहे. दुष्काळी भागात पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आगामी चार दिवसांत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात पावसास सुरुवात झाली. रविवारी सकाळी नोंदल्या गेलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासांत जतमध्ये ३२.९ मिलिमीटर पाऊस झाला. त्याचबरोबर आटपाडी व कवठेमहांकाळमध्येही हजेरी लावली.
रविवारी दिवसभर जत व परिसरात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली होती. आटपाडीतही दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सांगली, मिरज शहरामध्ये रविवारी दिवसभर ढगांची दाटी होती. त्यामुळे सूर्यदर्शन हाेऊ शकले नाही. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा मुक्काम राहणार आहे. या काळात तापमानातही काहीअंशी घट होण्याची शक्यता आहे. रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २९, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान अद्याप सरासरीपेक्षा एक अंशाने अधिक आहे.