सावकार धुमाळच्या चार साथीदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:09+5:302021-09-10T04:33:09+5:30
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील खासगी सावकार शैलेश धुमाळ याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या ...

सावकार धुमाळच्या चार साथीदारांना अटक
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील खासगी सावकार शैलेश धुमाळ याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या चार साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. धुमाळ याने एकाचे २० लाखांचे घर स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
सुरेश हरी शिंदे (वय ५६, अंबिकानगर, म्हैसाळ), संजय बापू पाटील (५२), जावेद बंडू कागवाडे (३५) व अमोल आनंदा सुतार (३०, रा. म्हैसाळ) अशी संशयितांची नावे आहेत. शिंदे याचे किराणा दुकान आहे, तर पाटील शेती करतो. कागवाडे व सुतार मजुरी करतात.
दीक्षित म्हणाले की, शैलेश धुमाळ व त्याचा मुलगा आशिष दहा वर्षांपासून म्हैसाळ परिसरात बेकायदा सावकारी करतात. गेल्या आठवड्यात त्याच्या विश्रामबाग व सांगलीतील घरावर छापा टाकून कोरे धनादेश, मुद्रांक व रोकड जप्त केली होती. धुमाळ व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात घर, हाॅटेल व इतर मालमत्ता हडप करीत होता. त्याने म्हैसाळमधील अशोक कोरवी तसेच मनीषा हाॅटेलच्या मालकीण वैभवी गायकवाड यांच्या १२ गुंठ्यांतील हाॅटेलवर कब्जा केला आहे. हाॅटेल खरेदी करताना दस्तऐवजावर ६३ लाख रुपयांची नोंद केली. पण त्यांतील एक रुपयाही गायकवाड यांना दिले नाहीत. शिवाय त्यांच्याच परवान्यावर बार चालविला जात असल्याचे समोर आले आहे.
दिलीप बाबूराव बेळवे (५९) यांचे घरही त्याने सावकारीतून ताब्यात घेतले आहे. बेळवे यांना २००६ साली पाच लाखांचे कर्ज दिले होते. जानेवारी २०११पर्यंत बेळवे यांनी धुमाळला १९ लाख ९५ हजार परत केले. तरीही व्याजापोटी त्याने २० लाख किमतीचे घर खरेदी करून घेतले. खरेदीवेळी त्याची किंमत ३ लाख दाखविली आहे. या फसवणुकीनंतर बेळवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण गावातील दादासाहेब भानुसे यांनी वेळीच दोरी कापल्याने त्यांचा जीव वाचला. दहा वर्षांपूर्वी बेळवे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही मिळून आली आहे. धुमाळ याच्या आणखी चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या मालमत्तेचीही पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे गेडाम यांनी सांगितले.
चौकट
१८ सावकारांवर कारवाई
गेल्या आठ महिन्यांत १८ सावकारांविरुद्ध २९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात इस्लामपूर येथील जलाल मुल्ला, सांगलीतील दत्ता ऐगळीकर व त्याचा साथीदार संजय पाटील, बिरनाळ येथील काशीराम बंडगर व त्याचा मुलगा कुमार याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. खासगी सावकाराच्या जाळ्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी कुणालाही न घाबरता पोलिसांत तक्रारी द्याव्यात. त्यांना सहकार्य केले जाईल, असे गेडाम म्हणाले.