नेर्ले (ता. वाळवा) येथे रेठरेहरणाक्ष येथील संस्थापक पॅनलच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनलला खिंडार पडले. रेठरेहरणाक्ष येथील संस्थापक पॅनलच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेर्ले येथे सहकार पॅनलमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
रेठरेहरणाक्ष येथील संस्थापक पॅनलचे गत निवडणुकीत उमेदवार असणारे केदार शिंदे, माजी सरपंच श्रीरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ गोंदील, क्रांती शिंदे, अनिल कदम, विवेक अवसरे, पैलवान विष्णू शिंदे यांच्यासह संघर्ष ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेर्ले येथील जयकर कदम यांच्या निवासस्थानी डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला.
यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. सर्व कार्यकर्त्यांची घरवापसी झाली आहे. या सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल. मध्यंतरीच्या काळात यांची वाट चुकल्याने ते काही काळ बाजूला होते. परंतु पूर्ववत ते आपल्या मूळ घरात आलेले आहेत, असे ते म्हणाले. माजी सरपंच जयकर कदम यांनी स्वागत केले. केदार शिंदे हे त्यांचे मावसभाऊ असल्याने पैलवान कदम यांच्या प्रयत्नामुळे केदार शिंदे व संघर्ष ग्रुप रेठरेहरणाक्षचे कार्यकर्ते यांनी नेर्ले येथे प्रवेश केला. यावेळी पै. आनंदराव मोहिते, वैभव जाखले, बंडा जाखले, धनाजी ढेकळे, भास्कर कदम उपस्थित होते.