माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:03 IST2018-02-14T01:03:25+5:302018-02-14T01:03:39+5:30
मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे (वय ७७) यांचे मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने येथील वॉन्लेस रूग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.

माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
मिरज : मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे (वय ७७) यांचे मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने येथील वॉन्लेस रूग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास धत्तुरे यांना घरात हृदयविकाराचा धक्का बसला होता. उपचारासाठी त्यांना तातडीने वॉन्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. रियाज मुजावर, डॉ. शिरीष पारगावकर, डॉ. सुबोध धनवडे यांनी तातडीची एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. धत्तुरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्यासह नगरसेवक, नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
माजी आमदार हाफिज धत्तुरे यांची ‘आम आदमी’ (सामान्य माणूस) अशी मिरज परिसरात ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता. नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असताना, ते दोन वेळा मिरज विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
त्यांना १९९९ मध्ये सिनेअभिनेते दिलीपकुमार व शब्बीर अन्सारी यांच्या प्रयत्नाने आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना व काँग्रेसच्या आघाडीकडून मिरज विधानसभा मतदार संघासाठी पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. त्यावेळी राजकारणात फारसे परिचित नसलेले धत्तुरे अचानक उमेदवारी मिळूनही निवडून आले. त्यानंतर २००५ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी दहा वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आमदारकी पणाला लावली. महापालिकेच्या निर्मितीनंतर त्यांनी स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनेही केली. मिरजेतील अतिक्रमणे हटविताना त्यांनी खोकीधारकांची बाजू घेतली. खोकीधारकांचे प्रथम पुनर्वसन करा, मगच खोकी हलवा अशी मागणी करीत त्यांनी अतिक्रमण हटविणाऱ्या जेसीबी यंत्रासमोर आडवे पडत अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार विरोध केला होता.
आमदारकीच्या कारकीर्दीत त्यांनी विकासात्मक कामांनाही प्राधान्य दिले. अनेक गोरगरिबांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड होती. आमदार असूनही साधी राहणी असलेले माजी आ. हाफिज धत्तुरे यांची नागरिकांत ‘आम आदमी’ अशीच ओळख होती.
धत्तुरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक आलम धत्तुरे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.