इस्लामपूरचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:47+5:302021-05-01T04:24:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक, माजी नगरसेवक, ह. ...

इस्लामपूरचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक, माजी नगरसेवक, ह. भ. प. पै. चंद्रकांत महादेव पाटील (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वारकरी संप्रदायातील ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
चंद्रकांत पाटील हे शहर आणि परिसरातील विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि सहकारी संस्थांशी निगडित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे मानसपुत्र अशी त्यांची ओळख होती. शहरासह तालुक्यात ते चंदूआबा या नावाने परिचित होते. शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे ते अखेरपर्यंत अज्ञातशत्रू राहिले. सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. उरुण विकास सोसायटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. कुस्ती, अध्यात्म, समाजकारण, सहकार, शेती आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. माजी नगराध्यक्ष स्व. अशोकदादा पाटील यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते अखेरपर्यंत ओळखले जात होते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा आदर्श त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. सामान्य कार्यकर्त्यांसाठी चंदूआबा म्हणजे हक्काचा आधार होता. पंढरीच्या विठ्ठलाचे ते नि:स्सीम भक्त होते. अण्णासाहेब डांगे यांच्याबरोबर त्यांनी कित्येक वर्षे पायी वारी केली होती. त्यांच्या निधनामुळे उरुण परिसरात शोककळा पसरली.