कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:42+5:302021-06-21T04:18:42+5:30
अर्जुन कर्पे कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले असून, गुडग्याला बाशिंग बांधलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली ...

कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
अर्जुन कर्पे
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले असून, गुडग्याला बाशिंग बांधलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. विद्यमान नगरसेवक पुन्हा संधी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत, तर नवे चेहरे ही नगरपंचायतीच्या मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी अजितराव घोरपडे गट, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, वंचित आघाडी या सर्वांनीच तयारी सुरू केली आहे. गत निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि राष्ट्रवादीची युती होती, तर खासदार संजयकाका पाटील यांनी एकाकी लढत दिली होती. एका जागेवर अपक्ष निवडून आले होते. एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी सात जागा, घोरपडे गट-पाच, खासदार संजयकाका पाटील गट चार व एक अपक्ष असे बलाबल होते.
कवठेमहांकाळ शहरात अजितराव घोरपडे यांचा एकजूट गट व कट्टर कार्यकर्ते आहेत. त्याच्याशिवाय सत्तेचे सिंहासन कोणी एकतर्फी मिळवूही शकत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीला कायमचेच गटातटाचे ग्रहण लागले आहे. आमदार सुमनताई पाटील यांचा गट व अनिता सगरे यांचा गट, शिवाय राष्ट्रवादीवर नाराज असणारे कार्यकर्ते याचा ही एक गट असे त्रांगडे राष्ट्रवादीचे झाले आहे. त्यामुळे सत्तेचे दिवास्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला ही निवडणूक भलतीच जड जाणार आहे.
खासदार संजयकाका पाटील गट तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार सुमनताई पाटील यांच्याबरोबर छुपी युती करून आहे. हे जनतेसमोर उघड झाले आहे. नगरपंचायतच्या निवडणुकीत खासदार गट एकटा लढणार की आमदार पाटील गटाबरोबर जाणार हाही प्रश्न आहे.
चौकट
सगरे गट निर्णायक
तालुक्यात तसेच शहरात सगरे गट हा आजवर एक दबाव गट म्हणून कार्यरत आहे. परंतु विजय सगरे यांचे अकाली निधन, महाकाली कारखाना बंद पडणे यामुळे सगरे गट हा थोडासा दबावाखाली आहे, परंतु तालुक्यात तसेच शहरात सगरे गटाला अस्तित्व टिकवण्यासाठी ठाम व ठोस निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा त्यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. एकूणच कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये सत्ता कुणाकडे हा आगामी राजकीय प्रश्न आहे. परंतु ही निवडणूक तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक असेल.