शिराळ्यात वन विभागाचा अजब कारभार
By Admin | Updated: January 18, 2016 00:34 IST2016-01-18T00:05:53+5:302016-01-18T00:34:37+5:30
तीन बंधाऱ्यांसाठी एकच रक्कम : शिवाजीराव नाईक यांची चौकशीची मागणी

शिराळ्यात वन विभागाचा अजब कारभार
विकास शहा -- शिराळा शासकीय अधिकारी काहीही करु शकतात. अगदी असेच एक जागतिक आश्चर्य करण्यात आले आहे, वन विभागातील मातीच्या तीन वेगवेगळ्या बंधाऱ्यांच्या अंदाजपत्रकामध्ये! तीन वेगवेगळ्या गावात बांधण्यात येणाऱ्या तीन मातीच्या बंधाऱ्यांची अंदाजपत्रकात रक्कम आहे ९ लाख ९५ हजार ११४ रुपये. म्हणजे एकाही रुपयाचा फरक करण्यात आलेला नाही. बांधकामाबाबत चक्क जागतिक दर्जाच्या अभियंत्याने ठरविले तरीही असे एकसारखे बांधकाम तो करु शकणार नाही. मात्र हे दिव्य शासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या घटनेबाबत आ. शिवाजीराव नाईक यांनी अर्थ-नियोजन मंत्री, वनमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
शिराळा तालुक्यात वन विभागामार्फत कुसाईवाडी, अस्वलवाडी आणि धसवाडी याठिकाणी ९ लाख ९५ हजार ११४ रुपये अंदाजपत्रके असणारे तीन मातीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी निविदा मागविण्यात आल्या. हे तीन बंधारे बांधण्याची ठिकाणे वेगवेगळी आणि वेगवेगळ्या भौगोलिक रचना असणारी आहेत. तसेच बंधारे बांधण्यात या बंधाऱ्याच्या पायाची स्थिती, आकारमान हे वेगवेगळे असते. त्याचबरोबर लांबी, रुंदीही वेगळी असते. अगदी एक- दोन फुटाच्या अंतरावर जमिनीबाबत एकसारखेपणा नसतो. त्यामुळे बांधकाम करताना याच्या अंदाजपत्रात काहीवेळा लाखो रुपयांचा फरक पडतो.
मात्र या तीन वेगवेगळ्या गावात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यांबाबत एकाही रुपयाचा अंदाजपत्रकात फरक नाही. जर अशाप्रकारे एकसारखे अंदाजपत्रक असणारे बंधारे एकाच खर्चात पूर्ण झाले, तर हे जगातील आणखी एक आश्चर्य होईल.
हे झाले स्थापत्य विभागाचे काम. त्यानंतर या कामासाठी ठेकेदारांनी निविदा भरल्या. यातील एक निविदा चक्क ४५ टक्के कमी दराने ५ लाख ४७ हजार ३१३ रुपये दराने! त्यामुळे या कामाचे गौडबंगाल काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला हा ठेका मिळणार आहे. तिन्ही गावांची भौगोलिक स्थिती, जमिनीचा स्तर वेगवेगळा असताना, या कामाचे एकाच रकमेचे अंदाजपत्रक तयार कसे झाले?, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आ. नाईक यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे या तीनही कामांचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करू, तसेच जर ४५ टक्के कमी रकमेने काम करणारा हा ठेकेदार अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम करण्याची शक्यता आहे किंवा ही अंदाजपत्रके मुद्दाम वाढवलेली असली पाहिजेत. त्यामुळे या तिन्ही कामांच्या फेरनिविदा काढाव्यात, तसेच तिन्ही कामांच्या ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ पाहणी करुन अंदाजपत्रके तयार करावीत, अशी मागणी केली आहे.
अशा आहेत त्रुटी : फेरनिविदेची मागणी
कुसाईवाडी, अस्वलवाडी, धसवाडी याठिकाणी मातीच्या बंधाऱ्याची एकाच रकमेची अंदाजपत्रके
ठेकेदाराने ४५ टक्के कमी दराने काम करण्याची निविदा दाखल
यात अंदाजपत्रकात रक्कम वाढविली असावी किंवा ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होण्याची शक्यता
आ. नाईक यांच्याकडून या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची व फेरनिविदा काढण्याची मागणी