वनविभागाच्या भरती परीक्षेत सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी कॉपी, छत्रपती संभाजीनगरातील चौघांवर गुन्हा दाखल
By शरद जाधव | Updated: August 10, 2023 17:32 IST2023-08-10T17:20:28+5:302023-08-10T17:32:03+5:30
मदत करण्याच्या मोबदल्यात दहा लाख रूपयांचा व्यवहार

वनविभागाच्या भरती परीक्षेत सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी कॉपी, छत्रपती संभाजीनगरातील चौघांवर गुन्हा दाखल
सांगली : वनविभागाच्या वनरक्षक भरती परीक्षेत सलग दुसऱ्या दिवशी गैरप्रकार झाला. मंगळवारी डमी विद्यार्थी सापडला असतानाच, बुधवारी पुन्हा डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला. याप्रकरणी गैरप्रकार करणारा उमेश संजय हुसे (रा. आडगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर), साहित्य पुरवठा करणारा बालाजी नामदेव तोगे (रा. खोडेगाव,ता. जि. छत्रपती संभाजीनगर), एजंट राजु नांगरे आणि अजय नांगरे (दोघेही रा. काद्राबाद ता, जि. छत्रपती संभाजीनगर) अशा चौघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या वनविभागाच्या वनरक्षक भरती परीक्षेत गेल्या आठवड्यात डिव्हाईसव्दारेच कॉपीचा प्रयत्न झाला होता. मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्चमध्ये ही परीक्षा होत आहे. दुपारी पेपर सुरु होण्यापुर्वी केलेल्या तपासणीत उमेश हुसे याच्या हालचालीबाबत परीक्षा नियंत्रकांना संशय आला.
यानंतर तपासणीत त्याच्या अंतरवस्त्रामध्ये एका कम्युनिकेशन डिव्हाईस, मायक्रोफोन मिळून आला. हे साहित्य कॉपीसाठी बालाजी तोगे याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत एजंट राजु नांगरे आणि अजय नांगरे यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा लाखांचा सौदा...
वनरक्षक भरती परीक्षेत मदत करण्यासाठी राजु नांगरे व अजय नांगरे, बालाजी तोगे यांचे संगनमत होते. यात मदत करण्याच्या मोबदल्यात दहा लाख रूपयांचा व्यवहार झाला होता. परीक्षा झाल्यानंतर हे पैसे दिले जाणार होते. त्याअगोदरच संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर कनेक्शन
वनविभाग भरती परीक्षेत गैरप्रकाराचा गेल्या सहा दिवसातील तिसरा प्रकार आहे. यातील सर्व संशयित हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. गेल्या आठवड्यात अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव ता. वैजापूर) आणि अर्जून रतन नार्डे (रा. संजरपूरवाडी ता. वैजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर मंगळवारी प्रदीप कल्याणसिंग बैनाडे (रा. बेंद्रेवाडी), राहुल सुखलाल राठोड ( रा. हरसील) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी कारवाई झालेले सर्व संशयितही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच आहेत.