इस्लामपुरात प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर

By Admin | Updated: September 1, 2014 23:10 IST2014-09-01T22:05:31+5:302014-09-01T23:10:23+5:30

परंपरा कायम : आकर्षक मोठ्या मूर्तींसह विद्युत रोषणाईवर अनेक मंडळांचा भर

Focus on the illuminating views in Islampur | इस्लामपुरात प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर

इस्लामपुरात प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक व बुरुड गल्ली परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी हलत्या देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. जयमल्हारचा येळकोट, पितृप्रेम, गोरा कुंभार, भैरवनाथाचे बगाड अशा देखाव्यांची आकर्षक पध्दतीने उभारणी करण्यात आली आहे. तर शहरातील बहुतेक मंडळांनी आकर्षक व मोठ्या उंचीच्या गणेश मूर्ती उभारण्यावर भर दिला आहे.
गणेशोत्सव साजरा करण्याची ५८ वर्षांची परंपरा असणाऱ्या बुरुड गल्लीतील श्री बाल गणेश मंडळाने यंदा ‘जयमल्हार’ या मालिकेतील कथानक घेऊन त्याचा हलता देखावा अत्यंत आकर्षक पध्दतीने मांडला आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर होत असताना मनोहारी विद्युत रोषणाईत उधळला जाणारा भंडारा पाहिला की भाविकांना क्षणभर आपण या मल्हाराचे भक्त झाल्याची अनुभूती येते. या देखाव्याने शहरातील भाविकांची गर्दी खेचली आहे.
कापूसखेड रस्त्यावरील कलासागर गणेशोत्सव मंडळाने २२ वर्षांच्या परंपरेला साजेशी अशी पितृ प्रेमावरील संवेदनशील देखाव्याची उभारणी केली आहे. आपल्या मुला-बाळांसाठी रात्रंदिन काबाडकष्ट उपसणारा बाप आईच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षिला जातो. मात्र ज्यावेळी मुलं संकटात सापडतात त्याचवेळी ‘अरे बाप रे’ अशी आरोळी ठोकतात. नेमका हाच धागा पकडून कलासागरच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनातील आईइतकेच बापाचेही महत्त्व आहे आणि त्याचे प्रेमही उत्कट असते अशा संवेदनशील मनाने हा देखावा उभारला आहे. तर श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने संत गोरा कुंभार यांची विठ्ठलाचे नाम:स्मरण करताना देहभान हरपून गेल्याचा देखावा सादर केला आहे.
सावकार गल्लीतील श्री गणेश मंडळाने भैरवनाथाचे बगाड हा धार्मिक देखाव्याचा विषय साकारून आपल्या श्रध्दास्थानावरील प्रेम व्यक्त केले आहे. शहरात जवळपास ७0 ते ७५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, गांधी चौकातील ‘इस्लामपूरचा महाराजा’ गणेशोत्सव मंडळाने आकर्षक अशा शिश महालची मनोहारी प्रतिकृती साकारली आहे. विद्युत रोषणाईच्या नेत्रदीपक प्रकाश योजनेमुळे या झळाळणाऱ्या शिश महालातून भाविकांचा पाय निघता निघत नाही, अशी भावना निर्माण होत असते. बसस्थानक रस्त्यावरील लोकनेते राजारामबापू पाटील गणेशोत्सव मंडळाने देहू येथील तुकाराम गाथा मंदिराची अतिभव्य अशी प्रतिकृती उभारली असून, आकर्षक मूर्ती व विद्युत रोषणाईने भाविकांना प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. लाल चौकातील सिध्दिविनायक गणेशोत्सव मंडळाने नयनरम्य अशी संगीतावरील विद्युत रोषणाई केली आहे. सप्तर्षी, साथीदार, भाजी मंडई गणेश मंडळ, शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ, वळसे गल्लीतील शिवसागर गणेश मंडळांनी आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. (वार्ताहर)

धार्मिक सलोखा...
इस्लामपूर शहराला हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा आहे. संत- सुफींची पांढरी म्हणून या शहराची ख्याती आहे. शहरातील प्रत्येक सण, उत्सवात सर्वधर्मीय नागरिक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात. व्यक्तीगत आणि धार्मिक अभिनिवेश बाजूला ठेवून समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा संदेश देणाऱ्या या गणेशोत्सवाच्या उपक्रमातील सर्वांचा सहभाग हा सामाजिक आनंद द्विगुणित करणारा असतो. दिवाळीवेळी आकर्षक गडकिल्ल्यांची उभारणी करुन महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याची इत्यंभूत माहिती देणारा मुस्लिम समाजातील आझाद मुल्ला या युवकाने यंदा तेवढ्याच उत्साहाने श्रीगणेशाचीही प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील गणेशोत्सव हा समाजातील सर्व घटकांच्या दृष्टीने आनंद सोहळाच ठरत आला आहे.

Web Title: Focus on the illuminating views in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.