शिक्षणाचं बहरलेलं शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST2021-02-21T04:49:01+5:302021-02-21T04:49:01+5:30

आपल्या हातून नवी पिढी घडताना, त्यांचा आयुष्याचा आलेख वर जाताना मिळणारे समाधान हे माझ्या आयुष्याचे सार्थक समजतो. आपल्या क्षेत्राविषयीची ...

A flourishing field of education | शिक्षणाचं बहरलेलं शिवार

शिक्षणाचं बहरलेलं शिवार

आपल्या हातून नवी पिढी घडताना, त्यांचा आयुष्याचा आलेख वर जाताना मिळणारे समाधान हे माझ्या आयुष्याचे सार्थक समजतो. आपल्या क्षेत्राविषयीची आवड, त्यासाठीचा प्रामाणिकपणा जपल्यामुळे मला चांगले फळ मिळाले. आयुष्यात काटेरी, कडवट अनुभव पचविण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक कार्याचा गोडवा परिणामकारक ठरला. आयुष्यभर मनातील हे शिवार मी फुलवत राहिलो. यापुढेही या शिवारातून नव्या पिढीचे चांगले पीक मला समाजासाठी द्यायचे आहे. दीड तपांच्या सेवेतून मिळालेले समाधान माझ्यासाठी अमूल्य आहे.

- किशोर दत्तात्रय चंदुरे, कृषी पर्यवेक्षक, क्रीडा प्रशिक्षक, सांगली

आकाशातून बरसणाऱ्या धारांनी मातीतून फुलणारी हिरवाई जशी डोळ्यांना सुखावणारी असते, अगदी त्याचप्रमाणे आयुष्याच्या प्रामाणिक वाटेवरुन फुलणारी आत्मिक समाधानाची हिरवाईसुद्धा माणसाला समृद्धी देत राहते. असाच काहीसा अनुभव घेत सांगलीच्या किशोर चंदुरे यांनी कृषी, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात आपली वाटचाल समृद्ध केली.

साखरशाळेतील मुलांना शिकविण्यापासून सामाजिक कार्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. चंदुरे यांचा जन्म १६ ऑगस्ट १९७७ रोजी सांगलीत झाला. सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये, विलिंग्डन महाविद्यालय, पतंगराव कदम महाविद्यालय, कुरुंदवाड येथील पी. एस. कॉलेज व औरंगाबाद येथील एम. एस. कॉलेजमध्ये त्यांनी बी. एस्सी. (ॲग्री), बी. पीएड., एम. पीएड. अशा विविध विषयांचे शिक्षण घेतले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांनी सतत काहीतरी नवे शिकण्याचा प्रयत्न केला. माधवनगर येथे वसंतदादा साखर कारखान्याच्या साखरशाळेत त्यांनी सुरुवातीला काम केले. गाेरगरीब गुळकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यापासून चंदुरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची पायाभरणी झाली. साखरशाळेत मुलांना आणणे हाच कसरतीचा भाग होता. शाळेतील या मुलांची आई-वडिलांप्रमाणे सर्व सेवासुद्धा शिक्षक म्हणून चंदुरेंनी केली, पण त्यातून ती मुले घडत असल्याचा आनंद त्यांना मिळाला. अध्यापनाचा साखरशाळेतील गोडवा त्यांनी अनुभवला. त्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे कृषी पर्यवेक्षक म्हणून काम केले. मुक्त विद्यापीठाचे मार्गदर्शक म्हणून सेवा दिली. शाहू कृषी महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षक, ज्येष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत आहेत. नोकरीतला सेवाभाव व आवड जपली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम त्यांच्या हातून झाले. आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी अनुभवत खळाळत पुढे जाणाऱ्या प्रवाहाचा गुणधर्म कधीही सोडला नाही. या वाटचालीत त्यांना विलिंग्डनमधील प्रा. राजकुमार पाटील यांचे पाठबळ मिळाले. शिक्षण घेत असतानाच पाटील यांनी चंदुरेंना डेक्कन एज्युकेशन सोसायटीत काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शैक्षणिक करिअर करतानाही त्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांना मार्गदर्शन केले.

करिअरची ही वाट चालताना त्यांना आर्थिक ओढाताणही सहन करावी लागली. दीड हजारापासूनच्या नोकरीपासून त्यांनी सुरुवात केली. कितीही कसरत झाली तरी धरलेली वाट सोडायची नाही, अशी जिद्द त्यांनी मनाशी बाळगली आणि त्यात ते यशस्वी झाले. करिअरमध्ये प्रगतीच्या पायऱ्या चढत असताना त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. घरची परिस्थिती चांगली असली, तरी नोकरी नसलेल्या काळात त्यांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे कुटुंबियांचा विरोधही झाला. आयुष्याची जोडीदार म्हणून त्यांच्या पत्नी सुनयना यांची साथही मोठी होती. संसाराला हातभार लावतानाच आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात त्यांना पत्नीमुळे आधार मिळाला. संसार फुलला, करिअर सुरळीत झाले तरी संकटे नेहमी उभी राहिली. कोरोनाच्या काळातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यातूनही सावरत त्यांनी आपली अध्यापनाची वाटचाल कायम ठेवली. आजवरच्या प्रवासात त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले. गावोगावी किंवा कोणत्याही जिल्ह्यात जेव्हा त्यांना त्यांचा विद्यार्थी करिअरच्या वाटा चालताना दिसतो, तेव्हा त्यांना केलेल्या कामाचा अभिमान वाटतो. शेतकऱ्यांच्या पोरांना बांधावर जाऊन शिक्षण देण्याचे कामही त्यांनी केले. कृषक समाज सांगली, विश्रामबाग रेल्वे प्रवासी संघ, सम्राट कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, आंबेडकर जयंती उत्सव, रब्बी फुटबॉल जिल्हा असोसिएशन या संघटनांचे अध्यक्षपद, अनुसूचित जाती, जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष, यशवंत सेनेचे सचिव, राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. रक्तदान शिबिरांचे आयोजन, बचत गटांची चळवळ, दुष्काळग्रस्तांसाठी उपक्रम, पूरग्रस्तांसाठी मदत अशा सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. नामांकित संस्था, संघटनांनी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्कारानेही गौरविले आहे. त्यांची ही वाटचाल अध्यापनातील अनेकांना मार्गदर्शक ठरणारी आहेे.

Web Title: A flourishing field of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.