इस्लामपूरच्या अल्ताफ शेखचा युपीएससीत झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST2021-09-26T04:29:08+5:302021-09-26T04:29:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या अल्ताफ मोहंमद शेख याची ...

इस्लामपूरच्या अल्ताफ शेखचा युपीएससीत झेंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या अल्ताफ मोहंमद शेख याची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमधून निवड झाली. देशामध्ये त्याने ५४५ वा क्रमांक मिळवला आहे.
अल्ताफ शेख याने यापूर्वीच केंद्रीय गुप्तचर विभागाच्या परीक्षेत तसेच सशस्त्र दलाच्या केंद्रीय पोलीस उपअधीक्षक परीक्षेतही यश प्राप्त केले आहे. सध्या तो केंद्रीय गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मूळचे बारामती तालुक्यातील काठेवाडीचे शेख कुटुंबीय व्यवसायानिमित्त इस्लामपुरात स्थायिक झाले. वडील महंमद शेख यांचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय होता. पराकोटीची प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातून पुढे येत अल्ताफने हे यश मिळविले आहे.
त्याचे माध्यमिक शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. त्याने कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतून परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो गुप्तवार्ता अधिकारी परीक्षेत यशस्वी झाला. आता पुन्हा नागरी सेवा परीक्षेत यश प्राप्त केले आहे. त्याला आयपीएस रँक मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, संस्थेच्या सचिव सरोज पाटील, उपाध्यक्ष एन. आर. पाटील व केंद्र संचालक अजितकुमार पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.
मुख्य परीक्षा मार्गदर्शक
अल्ताफ शेख येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीत राज्यशास्त्र, इतिहास व राज्यसेवा मुख्य परीक्षा मार्गदर्शक आहे. तो इस्लामपूर परिसरात प्रसिद्ध असलेल्या दिवंगत बारामतीकर मिस्त्री तथा महंमद शेख यांचा मुलगा आहे.