जिल्हा परिषद परिसरात पाच पुतळे बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:54+5:302021-07-15T04:19:54+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ...

जिल्हा परिषद परिसरात पाच पुतळे बसविणार
सांगली : जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे बसविण्यास समितीने मंजुरी दिली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दिली.
शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीनंतर कोरे बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती आशा पाटील, सुनीता पवार, जगन्नाथ माळी, जितेंद्र पाटील, ब्रम्हदेव पडळकर, स्नेहलता जाधव, कार्यकारी अभियंता वृंदा पाटील, आदी उपस्थित होते.
कोरे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुतळा उभारणी कामाची निविदाही प्रसिध्द झाली असून, काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे. सहा महिन्यांत सर्व काम पूर्ण करणार आहे. या पुतळ्याशेजारीच महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आणि डॉ. आंबेडकर यांचे पुतळेही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व कामासाठी किमान दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी स्वीय निधीतून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. रूपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.