छापा पडताच पाच दरोडेखोर फरार
By Admin | Updated: July 3, 2014 01:01 IST2014-07-03T00:52:52+5:302014-07-03T01:01:22+5:30
पोलिसांची कारवाई : पिस्तुलासह हत्यारे जप्त; गुन्हेगार औरंगाबादचे

छापा पडताच पाच दरोडेखोर फरार
सांगली : दरोडा टाकण्यासाठी सांगलीत येत असलेल्या पाचजणांवर सांगलीवाडी येथे शहर पोलिसांनी छापा टाकला असता, पाचहीजण मोटार सोडून फरार झाले. मोटारीच्या तपासणीत पिस्तूल, चॉपर, लाकडी स्टिक यासह दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली, मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक महंमदरफीक शेख यांना सांगलीवाडी येथील शिवशंभो चौकात एका मोटारसायकलस्वाराकडून, स्विफ्ट कार (एमएच-१२ बीआर २५८३) मधून पाचजण दरोडा टाकण्याच्या तयारीने सांगलीत येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुन्या बुधगाव रोडवरील जकात नाक्याजवळ पहाटे सव्वातीन वाजता सापळा रचला असता, ही मोटार आढळून आली. पोलीस आल्याची चाहूल लागताच पाचही दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मोटारीत कंपनी बनावटीचे पिस्तूल, चॉपर, बेसबॉलच्या स्टिक, स्क्रू ड्रायव्हर्स अशी घातक शस्त्रे आढळली. मोटारीमधील एका बॅगेत या पाचजणांचा फोटो व पासबुकही आढळून आले. यावरुन कोपरगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, ही मोटार चोरीची असल्याचे निदर्शनास आले. व्हॉटस् अपवरुन फोटो पाठवला असता, ते गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
सर्वजण अट्टल गुन्हेगार
सांगलीत आलेल्या पाचपैकी चार गुन्हेगारांची नावे स्पष्ट झाली आहेत. यामध्ये चंद्र रावसाहेब पिंपळे, संतोष सुखदेव वायकर (दोघे रा. शिर्डी), गणेश काळे (टाकळी, ता. कोपरगाव), ज्ञानेश्वर रावसाहेब पिपळे (रा. औरंगाबाद) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर औरंगाबाद परिसरात अनेक गुन्ह्यांची नोंद असून, तेथून ते फरार झाले आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोटारीचा खरा क्रमांक (एमएच १६, एटी, ८१९१) असल्याचेही स्पष्ट झाले आहे.