स्वाभिमानी संघटनेत पहिली बंडखोरी
By Admin | Updated: September 23, 2014 00:11 IST2014-09-22T23:11:46+5:302014-09-23T00:11:25+5:30
इस्लामपूर मतदारसंघ : जिल्हाध्यक्ष बी. जी.पाटील यांचा अर्ज दाखल

स्वाभिमानी संघटनेत पहिली बंडखोरी
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरीचा पहिला झेंडा उंचावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाबासाहेब गणपती ऊर्फ बी. जी. पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, शिवसेनेचे भीमराव माने यांच्या समर्थकांसह इतरांनी १८ अर्ज निवडणूक कार्यालयातून घेतले. आतापर्यंत एकूण २८ अर्जांचे वाटप झाले आहे.
स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्याकडून न्याय मिळणार नसल्याची खात्री झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून बी. जी. पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा आज उमेदवारी अर्ज दाखल करुन स्पष्ट केला. कर्मवीर जयंतीचे औचित्य आणि पितृपक्ष पंधरवड्यातील अशुभ काळाला न जुमानता पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी पंचायत समितीमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढून निवडणूक कार्यालय गाठले. यावेळी दादासाहेब पाटील, मकरंद करळे, शहाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, अॅड. सुहास माळी, महेश पाटील, पै. अनिल पाटील उपस्थित होते.
दरम्यान, आज एकूण ११ जणांनी १८ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून घेतले. जयंत पाटील समर्थक बाळासाहेब पाटील व जितेंद्र पाटील यांच्यासाठी हेमंत पाटील यांनी, तर शिवसेनेच्या भीमराव माने यांच्यासाठी विजय वाले यांनी अर्ज घेतले. (वार्ताहर)