स्मारकात जाळपोळ

By Admin | Updated: June 11, 2014 01:04 IST2014-06-11T00:59:07+5:302014-06-11T01:04:41+5:30

सांगली : बाबाराव सावरकर स्मारकातील ग्रंथसंपदा, दुर्मिळ छायाचित्रे खाक

Fireworks in the Memorial | स्मारकात जाळपोळ

स्मारकात जाळपोळ

सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या स्मारकात काल, सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी जाळपोळ केली. येथील गावभागातील अमरधाम स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची दुर्मीळ छायाचित्रे, दुर्मीळ ग्रंथ, सावरकरांचे वैचारिक वाङ्मय, लाकडी साहित्य जळून खाक झाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. स्मारकावरील ध्वजही पेटवून देण्यात आला आहे.
येथील नदीकाठावर साठ वर्षांपूर्वी बाबाराव सावरकरांचे स्मारक उभारण्यात आले आहे. याच जागेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. स्मारकामध्ये मोठे सभागृह व एक लहान खोली आहे. या खोलीत वाचनालय असून, तेथे दुर्मीळ ग्रंथांसह सुमारे दीड हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत. सभागृहात धार्मिक कार्यक्रम व सभाही होतात. स्मारकाच्या आवारात दररोज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन होते, तसेच पूजाअर्चा केली जाते. स्मारकाच्या संरक्षणासाठी २४ तास रखवालदार ठेवण्यात आला आहे. मात्र तो दोन दिवस सुट्टी काढून परगावी गेला आहे. हीच संधी साधून अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सुरुवातीला सभागृहातील कापडाच्या बोळ्यांनी सोफासेट पेटवून देण्यात आला. त्यानंतर पुस्तकांची खोली पेटवून देण्यात आली.
स्मारकातून धुराचे लोट येत असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने पाहिले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक आले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण आग वाढतच गेल्याने महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांना एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
वाचनालयाच्या खोलीत तीन लाकडी कपाटे व दोन लाकडी रॅक होते. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह दुर्मिळ ग्रंथ-पुस्तके , सावरकरांचे वैचारिक वाङ्मय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचारपुस्तके अशी दीड हजारावर ग्रंथसंपदा होती. ती जळून खाक झाली. लाकडी कपाटे, टेबल, खुर्च्या व सोफासेटही जळाल्याने दोन लाखाचे नुकसान झाले आहे. स्मारकावर लावण्यात आलेला ध्वजही पेटविला आहे.
हे वृत्त समजताच सावरकर ट्रस्टचे सदस्य, हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ट्रस्टचे सदस्य सुहास प्रभाकर जोशी (रा. गावभाग) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
कार्यकर्त्यांची बैठक
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बाबाराव सावरकर विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना व संघाच्या कार्यकर्त्यांची स्मारकामध्ये बैठक झाली. यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने, सुहास जोशी, महेश पाठक, बाळासाहेब मोहिते, श्रीकांत शिंदे, हणमंत पवार, श्रीराम कुलकर्णी, रमेश कोटिभास्कर, अशोक तेलंग, राहुल कामत आदी उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शांत राहा, कारवाई होईल : सावंत
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, संशयितांची नावे निष्पन्न होतील, शांतता राखून पोलिसांना तपासात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या घटनेचे पडसाद उमटू नयेत, यासाठी सावंत यांनी जिल्ह्यातील पोलिसांना दक्षतचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fireworks in the Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.