अखेर जत स्मशानभूमीत नवीन जाळ्या
By Admin | Updated: December 26, 2014 00:18 IST2014-12-25T21:55:46+5:302014-12-26T00:18:58+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताचा दणका : नगरपालिका प्रशासनाला आली जाग

अखेर जत स्मशानभूमीत नवीन जाळ्या
जत : येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी खराब झाल्यामुळे अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील बातमी ‘लोकमत’मधून प्रसिध्द झाल्यानंतर जत नगरपालिका प्रशासनाने स्मशानभूमीतील मोडकळीस आलेली जाळी काढून तेथे नवीन जाळी बसविण्यास सुरुवात केली.
जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार आहे. शहरालगत हिंदू स्मशानभूमी असून, तेथे दोन पत्राशेड आहेत. त्यापैकी एका शेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या, तर एका शेडमध्ये अद्यापही जाळ्या नाहीत. बसविलेल्या जाळ्याही मोडकळीस आल्या होत्या. भुरटे चोर या जाळ्यांचा काही भाग चोरुन नेत होते. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचण निर्माण होत होती. काहीवेळा जमिनीवर लाकडे रचून अंत्यसंस्कार करावे लागत होते. त्यामुळे मृतदेह अर्धवट जळत होते. त्यातून मृतदेहांची विटंबना होण्याचे प्रकार घडत होते. तसेच काहीवेळा संपूर्ण मृतदेह जळेपर्यंत नातेवाईकांना स्मशानभूमीत बसून राहावे लागत होते. त्यामुळे स्मशानभूमीतील गैरसोयींबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या.
सध्या एकाच पत्राशेडमध्ये जत नगरपालिका प्रशासनाने दोन लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. शेजारी असणाऱ्या पत्राशेडमध्ये लोखंडी जाळी नाही. जत शहराचा वाढता विस्तार आणि येथील लोकसंख्येचा विचार करुन नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणीही दोन लोखंडी जाळ्या बसवून या परिसराची देखभाल करण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी जत नगरपरिषदेचे विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)