लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बेकायदेशीरपणे जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सामाजिक कार्यकर्ता असिफ बावा ४१ दिवसांनंतर अखेर शनिवारी पाेलिसांत हजर झाला. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
शहरातील नळभाग परिसरात दोन व्यक्तींमध्ये भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी महिला पोलीस आल्या होत्या. यावेळी तेथे येत बावाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून अरेरावी केली होती. यावेळी जमावातील एकाने महिला पोलिसाला धक्काबुक्की केली होती. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत बावा याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. शिवाय इतर संशयितांना अटक करण्यासाठी ‘कोंबिंग ऑपरेशन’ही राबविले होते.
जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर बावाने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. चार दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली होती. शनिवारी अखेर तो हजर झाला. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.