तासगाव पूर्वमध्ये द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:59+5:302021-03-30T04:16:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गव्हाण : तासगाव तालुक्यातील पूर्वभागातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशांतर्गत व देशाबाहेरील बाजारपेठेसाठी या ...

तासगाव पूर्वमध्ये द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गव्हाण : तासगाव तालुक्यातील पूर्वभागातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशांतर्गत व देशाबाहेरील बाजारपेठेसाठी या भागात फक्त वीस टक्के द्राक्षबागा शिल्लक राहिलेल्या आहेत.
सावळज, डोंगरसोनी, अंजनी, वडगाव, गव्हाण, वज्रचौंडे, लोकरेवाडी, वडगांव आदी गावांतून द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. लांबसडक, हिरवट दुधाळ साखरेची गोडी व विशिष्ट प्रकारची ग्राहकांच्या पसंतीची चव यामुळे दिल्ली, कोलकाता, ओडिशा, बंगलोर, मुंबई, हैदराबाद आदी बाजारांत या भागातील द्राक्षांस मोठी मागणी असते.
या भागातील काही गावांतून आगाप फळछाटणी घेऊन द्राक्षे लवकर बाजारात विक्रीस येतात. साधारणत: पंधरा एप्रिलपर्यंत हंगाम सुरू असतो.
यावर्षी द्राक्ष खरेदी करण्यासाठी व्यापारी मोठ्या संख्येने दाखल होऊनही मंदीमुळे द्राक्ष दर तुलनेने कमी राहिला. मागील वर्षी कोरोना संकटामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. बागेत माल जास्त दिवस राहिल्याने उत्पादन कमी होते. त्यामुळे यावर्षी द्राक्षास चांगला दर मिळेल असे वाटत होते. सुरवातीला मिळालाही; परंतु द्राक्ष मालास बाजारात मागणी नाही हे कारण सांगून दर पाडले गेले. तसेच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनची भीती घालून द्राक्ष दरात मोठी तफावत ठेवली.
चाैकट
आर्थिक बजेट बिघडले
यावर्षी द्राक्ष शेतीसाठी लागणारी खते, औषधे, संजीवके व मजुरीमध्ये वाढ झाली. त्यामुळे खर्चात वाढ झाली. पेट्रोल व डिझेल दरवाढीने बजेट कोलमडले. बँका व सोसायटीच्या कर्जामुळे शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. द्राक्ष पीक हे वातावरणातील बदलास अतिशय संवेदनशील असून पाऊस, गारपीट या संकटाला झगडून शेतकरी दर्जेदार द्राक्ष तयार करतात; परंतु बाजारपेठेत दर मिळत नसल्याने द्राक्ष शेतकरी हतबल आहेत.