क्रीडा स्पर्धांची फी अडीचपटीने वाढली
By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-13T23:36:03+5:302015-08-14T00:05:51+5:30
सर्वच वयोगटांतील खेळाडूंच्या फीमध्ये तब्बल अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे.

क्रीडा स्पर्धांची फी अडीचपटीने वाढली
बाहुबली : सध्या जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरूआहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भराव्या लागणाऱ्या सर्वच वयोगटांतील खेळाडूंच्या फीमध्ये तब्बल अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, शाळा, पालक व प्रशिक्षकांमध्ये फी बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
उदयोन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून सरकारने २0१२ मध्ये क्रीडा धोरण निश्चित केले. त्यानुसार विविध स्तरांवर प्रशासनामार्फत स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे यावर्षी जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रशासनाने फीमध्ये अडीचपट वाढ केलेली आहे.वैयक्तिक क्रीडा प्रकारात मागील वर्षांपर्यंत एका खेळ बाबींसाठी १0 रुपये असलेली फी आता २५ रुपये, तर सांघिक क्रीडा प्रकारांत एका संघाकडून १५ ऐवजी आता ५0 रुपये फी आकारण्यात येत आहे. अशा अधिकच्या फी आकारणीमुळे ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे शालेय स्तरावर खेळाडूंना आवश्यक सुविधा नसताना अशा प्रकारची फी वाढ म्हणजे मुलांना एका प्रकारे स्पर्धांपासून वंचित ठेवल्यासारखेच आहे.
राज्य सरकारने २0१२ मध्ये मंजूर केलेल्या क्रीडा धोरणामध्ये तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यापासून ते ग्रामीण भागातील मुलांना विविध क्रीडा प्रकारांत संधी मिळावी यासाठी अनेक सोयीसुविधा पुरविण्याचे निश्चित केले आहे. खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरापर्यंत आयोजन केले जाते. यामध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा, ही अपेक्षा असते. परंतु, यंदाच्या पावसाळी स्पर्धांमध्ये प्रवेश फीमध्ये केलेली वाढ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित ठेवण्यासारखी आहे. याबाबत क्रीडा संघटना, शाळा व पालकांनी एकत्रित येऊन विरोध करणे गरजेचे आहे. जेणेकरून अधिक विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतील. (वार्ताहर)
मनमानी कारभार
कोल्हापूर शहरातील शाळांकडून या स्पर्धांसाठी नियमित फी शिवाय अधिक फी घेतल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने याबाबत तीव्र विरोध नोंदवून संबंधितांना समज देण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
कायद्याचे उल्लंघन
आरटीई नियमानुसार ६ ते १४ वयोगटांतील मुलांना मोफत शिक्षणाची सोय शासनाने केली असताना १४ वर्षे वयोगटांतील क्रीडा स्पर्धेसाठी फी आकारणे म्हणजे आरटीई कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे या गटातील मुलांना क्रीडा स्पर्धांमध्येदेखील मोफत प्रवेश मिळालाच पाहिजे.