आटपाडी : माहेरी गेलेली पत्नी परत यावी, यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याच्या अपहरणाचा बनाव एकाने रचला होता. हा बनाव काही तासातच आटपाडी पोलिसांनी उघडकीस आणत अपहरणाच्या प्रकारावर पडदा टाकला.याबाबत अधिक माहिती अशी की, लिंगीवरे (ता. आटपाडी) येथील भाऊसाहेब कांबळे यांनी माहेरी गेलेली पत्नी परत यावी म्हणून आपलाच १० वर्षांचा मुलगा शिवराजला अज्ञाताने पळवून नेल्याची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी दिली होती. दहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत फिर्यादीची व आसपासच्या लोकांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. वडिलांनीच माहेरी गेलेली पत्नी परत यावी, यासाठी बनाव रचल्याचे तपासात स्पष्ट झाले. भाऊसाहेब कांबळे यांनी मुलगा शिवराज याला शुक्रवारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधव यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन विचारले असता, पत्नी माहेरहून येत नाही म्हणून मुलाला बहिणीकडे ठेवल्याचे सांगितले. मुलाला पळवून नेल्यावर तरी ती येईल म्हणून फिर्याद दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आत्याच्या घरात थांबलेल्या मुलाला भाऊसाहेब कांबळे यांच्या ताब्यात देत प्रकरणाला पूर्णविराम दिला.
Sangli: मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला, पोलिस चौकशीत वेगळाच प्रकार उजेडात आला; नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:12 IST