Fatal Alliance with Mahayuti | Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना

Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना

ठळक मुद्देमहायुतीशी घायाळ आघाडीचा सामनाआठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुका लक्षवेधी ठरणार

अविनाश कोळी 

सांगली : गेल्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे झालेले निधन, अनेकांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे दोन्ही पक्ष घायाळ झाले आहेत. पटावरचे सर्व मोहरे बदलल्याने आघाडीला आता जुन्या-नव्या चेहऱ्यांना घेऊन जिल्ह्यात क्रमांक एकवर विराजमान झालेल्या भाजप-शिवसेना युतीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.

प्रदीर्घकाळ आघाडीचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात भाजप-सेनेने २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली होती. आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून आघाडीला मोठा दणका दिला होता. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने आघाडी आणखीन् कमकुवत झाली. काँग्रेसचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम, मदन पाटील, शिवाजीराव देशमुख, हाफिज धत्तुरे, राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील, विलासराव शिंदे यांच्या निधनाने दोन्ही पक्षांना जबरदस्त धक्का बसला. बहुतांश मतदारसंघांतील सूत्रे आता दुसºया फळीकडे आली आहेत.

काँग्रेसमध्ये आ. मोहनराव कदम, सदाशिवराव पाटील आणि राष्ट्रवादीत जयंत पाटील हे दिग्गज नेते ताकदीने उभे आहेत. पतंगरावांच्या पश्चात आ. विश्वजित कदम यांनी मतदारसंघ सांभाळला असला तरी, त्यांच्यासमोर परंपरागत देशमुख घराण्याच्या माध्यमातून भाजपचे आव्हान आहे. त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख मैदानात उतरत आहेत.

आर. आर. पाटील यांच्या पश्चात सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळचा गड राखला असला तरी, सक्षम नेतृत्वाची गरज पक्षाला भासू लागली आहे. तेथे भाजपअंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. खासदार संजयकाका पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटात संघर्ष आहे. संजयकाका पाटील यांच्या पत्नी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगलीत दादा घराण्यातील विशाल पाटील, जयश्री पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसचा गड सांभाळण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी, त्यांना युतीच्या ताकदीसमोर अपयशाला सामोरे जावे लागत आहे. सांगलीतील प्रमुख संस्था आता भाजपकडे गेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनीही या मतदारसंघातील उमेदवारीवर दावा केला आहे. दुसरीकडे मदन पाटील यांचे कार्यकर्ते, जयश्री पाटील यांना मैदानात उतरविण्याची तयारी करीत आहेत. सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून आघाडीसमोर आव्हान आहे.

मिरज मतदारसंघात सामाजिक न्याय राज्यमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर उमेदवार निश्चित करताना, आघाडीला कसरत करावी लागेल. हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी, तगडा उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे.
खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्यासमोर सदाशिवराव पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचेही आव्हान आहे. आटपाडीतील देशमुख घराण्याची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर उमेदवार कोण, याचा निर्णय आघाडीच्या जागावाटपानंतर होणार आहे. या जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्यायही असणार आहे. सर्वच पक्षांकडे या मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: Fatal Alliance with Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.