‘कृषी संजीवनी’ला शेतकऱ्यांचाच ठेंगा!
By Admin | Updated: September 23, 2014 23:58 IST2014-09-23T23:32:50+5:302014-09-23T23:58:34+5:30
जिल्ह्यातील स्थिती : ८३ कोटींची थकबाकी, भरले केवळ ५.२९ कोटी; शासनाच्या चुकांमुळे थकबाकीचा डोंगर

‘कृषी संजीवनी’ला शेतकऱ्यांचाच ठेंगा!
अशोक डोंबाळे - सांगली -राज्य शासन आणि महावितरणने निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांकडील थकित वीज बिल वसुलीसाठी आॅगस्टमध्ये आणलेल्या कृषी संजीवनी योजनेला थकबाकीदारांनी ठेंगा दाखवला आहे. जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ३१५ ग्राहकांकडे ८३ कोटी रुपये वीज बिल थकित आहे. यापैकी १४ हजार ६९९ ग्राहकांनी केवळ पाच कोटी २९ लाख रुपये भरल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक कोंडीत सापडली आहे.
दुष्काळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज बिल वेळेवर भरता आले नाही. त्यातच महावितरणच्या काही चुकीच्या बिलांचाही परिणाम झाला. त्यामुळे दुष्काळात राज्य शासनाने शंभर टक्के वीज बिल सवलतीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ३३ टक्केच वीज बिल सवलतीचा आदेश आला.
शासनाच्या धरसोड निर्णयामुळे कृषी पंपांच्या थकबाकीचा डोंगर वाढला. यामध्ये काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक वीज बिल भरले नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांपूर्वी कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर ५० टक्के रक्कम शासन महावितरणला देणार होते. शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकीची रक्कम भरण्यासाठी महावितरणने तीन हप्ते करून दिले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ आॅगस्टची मुदत होती. या कालावधित शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी म्हणून महावितरणने धडपड केली. जिल्ह्यातील ८३ कोटी थकबाकीपैकी शेतकऱ्यांकडून ४१ कोटी ५० लाख रुपये वसूल होणे अपेक्षित होते. ही रक्कम वसूल झाल्यानंतर ४१ कोटी ५० लाख रुपये शासन अनुदान म्हणून महावितरणला देणार होते. मात्र शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या योजनेला ठेंगा दाखवल्याचे वसुलीच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
४१ कोटी ५० लाखापैकी आतापर्यंत केवळ पाच कोटी २९ लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३६ कोटी २१ लाख कसे वसूल करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.
आता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेतून थकबाकी भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, हा कालावधी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीचा असल्यामुळे मुदतवाढ दिल्याने थकबाकी वसूल होणार का, याचीही अधिकाऱ्यांना चिंता आहे.
विभागनिहाय कृषी पंपांची वसुली
इस्लामपूर : १५ हजार ७९२ ग्राहक : तीन कोटी नऊ लाख थकबाकी : एक कोटी २४ लाख वसुली अपेक्षित. त्यापैकी केवळ ५९ लाख वसूल
कवठेमहांकाळ : ४९ हजार २५० ग्राहक : १८ कोटी ७८ लाख थकबाकी : सात कोटी ५१ लाख वसुली अपेक्षित. त्यापैकी एक कोटी एक लाख वसूल
सांगली ग्रामीण : २९ हजार २९० ग्राहक : नऊ कोटी ४२ लाख थकबाकी : तीन कोटी ७७ लाख वसुलीची गरज : एक कोटी ६५ लाख वसूल
सांगली शहर : ५७३ ग्राहक : १२ लाख थकबाकी : पाच लाख वसुली होणे अपेक्षित : केवळ तीन लाख वसूल
विटा : २९ हजार २४३ ग्राहक : आठ कोटी १९ लाख थकबाकी : तीन कोटी २८ लाख वसुलीची गरज : एक कोटी ३३ लाख वसूल