शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार!
By Admin | Updated: July 29, 2014 23:30 IST2014-07-29T23:18:54+5:302014-07-29T23:30:49+5:30
जतमधील स्थिती : तलाठी सजामध्ये येत नसल्याने कामे रेंगाळली

शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार!
दरीबडची : महसूल विभागाचे दुर्लक्ष व संगणकीकरणाच्या नावाखाली जत तालुक्यातील तलाठी सजामध्ये येत नसल्याने सात-बारा, खाते उतारा, पीक नोंदी, वारसा हक्क, जागा, शेती खरेदीच्या नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. राष्ट्रीय पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. गावात शेतकऱ्यांना सात-बारा, खाते उतारे मिळत नाहीत. जतला येऊन उतारे घेऊन जावे लागत आहेत. काही गावांमध्ये कोतवाल, तलाठ्यांचे मदतनीसच काम पहात आहेत. उतारे न मिळाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील महसूल विभागाचे सात-बारा, खाते उताऱ्यांचे संगणकीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. प्रत्येक सजातील दफ्तर संगणकीकृत करण्यासाठी घेण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी गावकामगार गावातच येत नाहीत. गावातील कारभार कोतवाल, झिरो तलाठी यांच्या सहाय्याने सुरू आहे. शेतकऱ्यांना सात-बारा, खाते उतारा मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. जादा पैसे वसूल करुन शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. सात-बारा, खाते उताऱ्यावर सही आणण्यासाठी जतला जावे लागत आहे.
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना २०१४-१५ साठी योजना चालू आहे. खरीप हंगामातील बाजरी, मूग, भुईमूग या तीन पिकांसाठी विम्याची तरतूद शासनाने केली आहे. विमा हप्ता रक्कम बाजरीसाठी २२४ रुपये, मुगासाठी ३०२ रुपये, भुईमुगासाठी ८३३ रुपये पाच हेक्टरसाठी आहे. अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. परंतु तलाठी वेळेवर येत नसल्यामुळे सात-बारा, खाते उतारा मिळत नाही.
याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता, कोतवालाला जतला पाठवून त्यांच्यामार्फत उतारे देण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले जात आहे. पीक विम्यासाठी नोंद कशी करायची? हा यक्षप्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. मुदत संपण्यास आता केवळ दोनच दिवस राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला वेळेवर मिळत नसल्यामुळेही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तलाठ्यांना सजामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदारांनी द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
प्रतिकूल वातावरणाने कायम दुष्काळी तालुक्याचा शाप लाभलेल्या जतमधील शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेच्या दफ्तरदिरंगाईचाही शाप लाभत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. (वार्ताहर)
राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी पीक विमा योजना चालू आहे. या योजनेमध्ये तालुक्याचा समावेश असून, या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी केले आहे.