शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा सांगलीत मोर्चा, कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

By अशोक डोंबाळे | Published: February 29, 2024 06:41 PM2024-02-29T18:41:21+5:302024-02-29T18:41:52+5:30

'सरकारला निवडणुकीत हिसका दाखवा'

Farmers organization march in Sangli for loan waiver of farmers | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा सांगलीत मोर्चा, कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा सांगलीत मोर्चा, कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

सांगली : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांना हमीभाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जबाजारी बनला आहे. दुष्काळी उपाययोजना राबवल्या जात असताना कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला. शासनाच्याविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची गरज आहे. शासनाने जिल्हा टंचाईसदृश्य जाहीर केला असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, बँका पतसंस्थांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली होत आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. बेकायदेशीर कर्जवसुली तत्काळ थांबवण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली.

गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये अफू लागवडीला परवानगी आहे, त्या धर्तीवर राज्यात अफू शेतीचा परवाना देण्यात यावा, अशी मागणी मागणी आहे. शेतकऱ्याला विमा कंपनी निवडण्याचा पर्याय देण्यात यावा, सरकारने विमा कंपन्या निश्चित करू नयेत. शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, बंद पडलेले ऊस कारखाने पुन्हा सुरू करावेत. दोन ऊस कारखान्यांमधील हवाई अंतराची बंधने काढून टाका. जीएम बियाण्यांच्या वापरावर लादलेले निर्बंध उठवावेत. वन्यप्राणी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी समिती स्थापन करण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या बेदखल ठरवत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा रघुनाथदादांनी दिला.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिवाजी पाटील, आमगोंडा पाटील, धनपाल माळी, धनंजय कदम, प्रदीप जाधव, लक्ष्मण पाटील, शंकर मोहिते, राजगोंडा बिरनाळे, माणिक पाटील, वंदना माळी उपस्थित होते.

सरकारला निवडणुकीत हिसका दाखवा : रघुनाथदादा पाटील

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जाच्या खाईत शेतकरी अडकत चालला आहे. या सरकारकडून काही अपेक्षा पूर्ण होतील, असे दिसत नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत हिसका दाखवा, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.

Web Title: Farmers organization march in Sangli for loan waiver of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.