शेतकऱ्यांनो धीर धरा...भाजीपाल्याचा दर वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:40+5:302021-09-11T04:26:40+5:30
सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे ...

शेतकऱ्यांनो धीर धरा...भाजीपाल्याचा दर वाढतोय
सांगली : चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभरात तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. जिल्ह्यातच दुप्पट भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मागील महिन्यात भाजीपाल्याचे दर खूपच कमी झाले. उत्पादन खर्चही पदरात न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ढब्बू, वांगी, कारली काढून टाकली. सध्या सर्वच भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढून किलोला १० ते १५ रुपये झाला आहे. आणखी दर वाढेल, शेतकऱ्यांनो लाखमोलाचा भाजीपाला काढून टाकू नका.
जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, गवार, कोबी, फ्लाॅवर या भाजीपाल्यास मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरु, कोलकात्ता, दिल्ली येथे मोठी मागणी आहे, परंतु या शहरात आजही कोरोनाची भीती असल्यामुळे शासकीय कार्यालये, हॉटेल, वसतिगृह पूर्ण क्षमतेने चालू नाही. यामुळे भाजीपाल्यास मागणी नाही, म्हणूनच ऑगस्ट महिन्यात भाजीपाल्यास दर नव्हता. ढब्बू मिरची, वांगी, कारली, दोडका, कोबी, फ्लाॅवरला प्रतिकिलो दोन ते तीन रुपये दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पिकांवर नांगरच फिरवला. यातून पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला. सध्या दर दुपटीने वाढला असून प्रत्येक भाजीपाल्यास दहा ते पंधरा रुपये किलोच्या पुढे दर झाला आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे येत्या महिन्यात आणखी भाजीपाल्याची दरवाढ होईल, अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चौकट
भाजीपाल्याचे होलसेल दर (प्रति किलो)
भाजीचा प्रकार पूर्वीचा दर आजचा दर
ढब्बू ३ रुपये १२ ते १५ रुपये
वांगी ७ १८ ते २०
दोडका ५ १२ ते १५
कारली ३ ते ५ १० ते १२
कोबी २ ते ३ ७ ते १०
फ्लाॅवर ४ ते ५ १० ते १५
गवार १० ते १२ २० ते २५
भेंडी १२ ते १५ २५ ते ३०
कोट
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येत्या महिन्यात भाजीपाल्याची टंचाई निर्माण होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकण्याची घाई करु नये. असणाऱ्या भाजीपाल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-मनोज गाजी, कृषी अभ्यासक, आष्टा.
चौकट
ऊस परवडत नसल्यामुळे भाजीपाला
उसाला दर नाही, म्हणून वाळवा, मिरज, पलूस, तासगाव, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्यातील तरुण शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्यामुळे एकाचवेळी बाजारात भाजीपाला जास्त आल्यामुळे मागील महिन्यात दोन ते तीन रुपये किलो दोडका, ढब्बू, कारल्याचा दर झाला. येथे तरुण शेतकरी खूपच खचल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावरच नांगर फिरवला.