आटपाडी तालुक्यातील शेतकरी अवकाळीच्या मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:51 AM2021-03-04T04:51:30+5:302021-03-04T04:51:30+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या ...

Farmers in Atpadi taluka deprived of untimely help | आटपाडी तालुक्यातील शेतकरी अवकाळीच्या मदतीपासून वंचित

आटपाडी तालुक्यातील शेतकरी अवकाळीच्या मदतीपासून वंचित

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीचा पुरेपूर अनुभव सध्या आटपाडी तालुक्यातील शेतकरी घेत आहेत. अवकाळी पाऊस आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देणार, अशी घोषणा करणाऱ्या सरकारची मदत शिमगा आला तरीही मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अजून किती दिवस वाट पाहायची असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.

गेल्या जूनपासून आटपाडी तालुक्यात विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. सलग ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे आणि विशेषतः डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळिंबावर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला. त्यामुळे शेतकरी हबबल झाले. अशा परिस्थितीत शासनाकडून मदत मिळेल, ही आशा मात्र फोल ठरली.

पंचनामे होऊन सहा महिने होऊन गेले; परंतु आटपाडी तालुक्यातील दहा गावांतील शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाचीही मदत शासनाने केलेली नाही. तालुक्यातील शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाची वाडी आणि झरे या गावांतील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन कोटी चार लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.

अतिवृष्टीने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांसाठी दहा हजार आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये हेक्टर या दराने दोन हेक्‍टर मर्यादेपर्यंतच मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला; परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ही तुटपुंजी का असेना, पण मदत मिळणे गरजेचे होते. मात्र, अद्याप शेतकरी तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयात मदत कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत.

चौकट

शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार?

दिनांक २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली. दि. १ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला. १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी होती, त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. मात्र, अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात काही गावांतील शेतकऱ्यांना मदत दिली आहे. उर्वरित दहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल

- सचिन मुळीक

तहसीलदार, आटपाडी.

Web Title: Farmers in Atpadi taluka deprived of untimely help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.