‘कवठेमहांकाळ’मध्ये शेतकरी संघटनेचा शिरकाव

By Admin | Updated: December 29, 2014 23:44 IST2014-12-29T23:20:41+5:302014-12-29T23:44:06+5:30

ऊस दरासाठी आक्रमक पवित्रा : मोर्चेबांधणीस प्रारंभ; बोरगाव येथे पहिली शाखा सुरू

Farmer's association in 'Kavtheamahankal' | ‘कवठेमहांकाळ’मध्ये शेतकरी संघटनेचा शिरकाव

‘कवठेमहांकाळ’मध्ये शेतकरी संघटनेचा शिरकाव

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ तालुक्यात रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना आक्रमक झाली असून या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तडीस लावण्यासाठी संपूर्ण तालुकाभर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे काम जोमात सुरू करण्यात आले आहे. या संघटना बांधणीचा विडा शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव माने यांनी उचलला असून रघुनाथदादा पाटील यांनी प्रत्यक्ष कामाला या तालुक्यात सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना व त्यांच्या चळवळीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
वर्षानुवर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेला कवठेमहांकाळ तालुका या दोन वर्षात त्यातून बाहेर पडत आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्याच्या शिवारात सलग दोन वर्षे फिरविल्याने ५५ टक्के भूभाग ओलिताखाली आला आहे. या पाण्यावर ऊस, द्राक्षबागा, डाळिंब बागा, मका, गहू, इतर पिके यांचे उत्पादन वाढले आहे.
मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव तर मिळतच नाही. दलालांचे मोठे जाळे खरेदी-विक्री प्रक्रियेत असल्याने शेतकऱ्यांना फायदा कमी प्रमाणात मिळतो. कधी-कधी मोठा तोटाही सहन करावा लागतो. उसाचे क्षेत्र मिळूनही एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर मिळत नाही. एरव्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या वल्गना करणाऱ्या विविध संघटना ऐन लढाईच्यावेळी गायब होतात. निवडणुका संपल्या की हे नेतेही गायब होतात, असे विदारक चित्र आहे.
मात्र शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यास पाटील यांनी सुरुवात केली आहे. बोरगाव येथे रघुनाथदादांच्या शेतकरी संघटनेच्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन नुकतेच झाले. या मेळाव्यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर आपण तीव्र लढा उभारणार असल्याचे सांगितले आहे.
करोली (टी), हिंगणगाव, रांजणी, अग्रण धुळगाव, ढालगाव, कुची, खरशिंग, नागज, अलकूड (एस), कोकळे येथे या महिन्यात संघटनात्मक बांधणी करण्याचे काम सुरू झाले आहे. अशोकराव माने यांनी संघटना बांधणीसाठी गावा-गावात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. .
किमान रघुनाथदादा पाटील यांची तरी शेतकरी संघटना येथील शेतकऱ्यांचे प्रश्न तरी सोडवते का ते पहावयाचे आहे की ये रे माझ्या मागल्या अशीच अवस्था त्यांचीही होते, हे लवकरच कळेल.

संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असून, कवठेमहांकाळ-सारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आपण संघटनेच्या माध्यमातून तडीस नेऊ, त्यादृष्टीने तालुक्यात संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू आहे.
- रघुनाथदादा पाटील,
नेते, शेतकरी संघटना



संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असून, कवठेमहांकाळ-सारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आपण संघटनेच्या माध्यमातून तडीस नेऊ, त्यादृष्टीने तालुक्यात संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू आहे.
- रघुनाथदादा पाटील,
नेते, शेतकरी संघटना

Web Title: Farmer's association in 'Kavtheamahankal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.